‘कृष्णा’मध्ये सोमवारी ‘बायोमेक इन इंडिया–३’ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा शाश्वत विकासासाठी होणारा संगम उलगडून दाखवणारी ‘बायोमेक इन इंडिया–३’ ही आंतरराष्ट्रीय परिषद कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे सोमवार दि. १९ ते बुधवार दि. २१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

संशोधक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग : कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभणार आहे.

७०० हून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी : मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत ‘शाश्वत नवोपक्रम व मानवी कल्याणासाठी भारतीय ज्ञानप्रणाली आणि आधुनिक विज्ञान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर सखोल चर्चा होणार आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली असून, विविध देशांतील तज्ज्ञ वक्ते परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.

विचारमंथन : भारतीय ज्ञानपरंपरेतील प्राचीन ग्रंथांमधील भौतिकशास्त्र व पृथ्वी विज्ञानाची तत्त्वे, त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता, जीवशास्त्र, कृषी व पारंपरिक तंत्रज्ञान, आयुर्वेद व योगाचे आधुनिक विज्ञानाशी एकत्रीकरण, तसेच प्रशासन, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणालीची समकालीन भूमिका अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यासोबतच शोधपत्रिका सादरीकरण, भित्तीपत्रिका प्रदर्शन, प्रतिकृती (मॉडेल) सादरीकरण यांसारखे शास्त्रीय उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय वक्त्यांचा सहभाग : या परिषदेसाठी अमेरिका, आफ्रिका, नेपाळ, इटली, मलेशिया, जर्मनी, दक्षिण कोरिया आदी देशांतील तज्ज्ञांनी वक्ते म्हणून सहभाग नोंदविला आहे. सोमवार दि. १९ जानेवारी रोजी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

प्रमुख पाहुणे : यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तसेच नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दासगुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे यांनी दिली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!