आमदार डॉ. अतुल भोसले यांची घोषणा; येळगाव जिल्हा परिषद गटात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास
कराड/प्रतिनिधी : –
अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे नेते ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.
विश्वास : पक्षात सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. लोकभावना त्यांच्या पाठीशी असून, या निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल, असा विश्वासही आमदार भोसले यांनी व्यक्त केला.
भेट : आमदार डॉ. अतुल भोसले आणि ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर यांची भेट झाल्यानंतर उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील व यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विचारांचा मोठा वारसा : यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्वर्गीय जयसिंगराव (बापू) पाटील – उंडाळकर यांचे चिरंजीव असलेल्या ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांना विचारांचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक वर्षे त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करूनही त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान झाला नाही. त्यामुळे येळगाव जिल्हा परिषद गटातील जनतेच्या भावना जाणून घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी संजय सवादेकर हे भाजपकडून उमेदवारी लढवत असून, संगीता शेटे या देखील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.
प्रामाणिकपणा कुटुंबाचा मूलमंत्र : आमदार भोसले पुढे म्हणाले, ॲड. राजाभाऊ पाटील आणि आम्ही अनेक दिवसांपासून एकत्रितपणे काम करत आहोत. सामाजिक आणि राजकीय स्तरावर आमचे विचार जुळणारे आहेत. प्रामाणिकपणा हा त्यांच्या जीवनाचा आणि कुटुंबाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ एकाच दिशेने वाटचाल केली. मात्र, सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. याबाबत सखोल चर्चा करून सर्वांचा विचार विनिमय झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
परिवर्तन अटळ : येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजाभाऊ पाटील हेच निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार भोसले म्हणाले, जनतेमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक भावना आहेत. त्यामुळे येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.