कृष्णा कारखान्याचा सामाजिक पुढाकार; साखर शाळेतील २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कराड/प्रतिनिधी : –
पोटासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सामाजिक जाणीवेचा ठोस प्रत्यय दिला आहे. कारखान्याच्या साखर शाळेतील तब्बल २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून कारखान्याने शिक्षणप्रवाह टिकवून ठेवण्याचा मोलाचा प्रयत्न केला आहे.
शिक्षणाची संधी उपलब्ध : ऊसतोड मजुरांना सहा महिने कारखाना परिसरात वास्तव्य करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांना गावातील शाळांपासून दूर राहावे लागून शिक्षणात मोठा खंड पडतो. अनेक मुले या कारणामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांमुळे स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
सामाजिक बांधिलकी : शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर कृष्णा कारखान्यात दाखल झाले आहेत. या मजुरांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्य शिबिरे, मूलभूत सुविधा आणि आता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा उपक्रमांतून कारखाना आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे.
शालेय साहित्य वाटप : विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय साहित्यात पाटी, पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वह्या, तसेच गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश होता. साखर शाळांच्या यशस्वी संचालनासाठी जनार्थ सेवा संस्थेचे सहकार्य लाभत असून, या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान यांच्यासह शेती व उसविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.