आ. डॉ. अतुल भोसले; कोळे येथे भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा
कराड/प्रतिनिधी : –
भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात अभूतपूर्व विकास साध्य झाला असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही भाजपचे नेतृत्व आल्यास विकासाला अधिक गती मिळेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कराड दक्षिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.
प्रचार सभा : कोळे (ता. कराड) येथे आयोजित भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी विंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. शैलजा शिंदे, कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन कराळे आणि विंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. नंदाताई यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी व्यासपीठावर माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
भक्कम पाठिंबा देणारे गाव : आ. डॉ. भोसले म्हणाले, कोळे गावाची ओळख ही कायम भारतीय जनता पक्षाला भक्कम पाठिंबा देणारे गाव म्हणून राहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा येथे घट्ट रुजलेली आहे.
समाधान : विंग जिल्हा परिषद गटात गेल्या ५० वर्षांत जेवढा विकास निधी मिळाला नाही, तेवढा निधी भाजप सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देता आला, याचे समाधान आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप अशी तिन्ही पातळ्यांवर मजबूत साखळी निर्माण झाल्यास विकासाला कोणीही अडवू शकणार नाही. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे.
विकासाचा पाऊस पाडला : माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, आमदार झाल्यानंतर अतुलबाबा भोसले यांनी मतदारसंघात विकासाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. ते संपूर्ण जिल्ह्यात विश्वासाचे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, कराड पंचायत समिती सभापती आणि गटागणात भाजपचे सदस्य निवडून आणणे हे पुढचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे आवश्यक आहे.
आवाहन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन श्रीरंग देसाई यांनी केले.
अधिक ताकदीने निधी आणू शकतात : यावेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे आमदारांचे खरे विश्वस्त असतात. हे विश्वस्त भाजपचे असतील तर आमदार अधिक ताकदीने मतदारसंघासाठी निधी आणू शकतात, असे प्रतिपादन सचिन पाचपुते यांनी केले.
पक्षप्रवेश : यावेळी उमेदवार सौ. शैलजा शिंदे, अर्जुन कराळे आणि सौ. नंदाताई यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी घारेवाडी येथील गौरव घारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
उपस्थिती : सभेला जयवंत माने, विलास यादव, के. पी. यादव, मलकापूरचे नगरसेवक सुरज शेवाळे, आणे गावचे सरपंच किसन देसाई, सागर पाटील, सचिन देसाई, संजय तोडकर, विकास कदम, विनोद शिंगण, अमित माने, उमेश घारे, सुरेश घारे, धनाजी शिंदे, दादासाहेब कदम, मंगेश गरुड, सुनील पाटील, महादेव पाटील, उमेश खाडे, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.