यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ऊस वजनकाटा नेहमीच अचूकतेचे प्रतीक मानला जातो. ही विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या शासकीय भरारी पथकाच्या अचानक तपासणीत कारखान्याचा वजनकाटा प्रत्येक चाचणीत अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याचा ‘धर्मकाटा’ म्हणून असलेला लौकिक अबाधित राहिला आहे.
तपासणी करण्याचे आदेश : सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्या अनुषंगाने वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शासकीय भरारी पथकाने कृष्णा सहकारी साखर कारखान्याला अचानक भेट देऊन सखोल तपासणी केली.
वजन व फेरवजनानंतर अचूक नोंद : या तपासणीदरम्यान ऊसाने भरलेल्या वाहनांचे प्रत्यक्ष वजन घेण्यात आले. गव्हाणीकडे गेलेल्या काही गाड्या पुन्हा इलेक्ट्रॉनिक वे-ब्रिजवर आणून फेरवजन करण्यात आले. प्रत्येकवेळी वजनात कोणताही फरक न दिसता अचूक नोंद होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिजिटल डिस्प्लेवर भरलेल्या, तसेच रिकाम्या वाहनांचे वजन पारदर्शकपणे व अचूक दिसत असल्याची खात्री पथकाने केली. या पाहणीअंती शासकीय पथकाने कृष्णा साखर कारखान्याचा ऊस वजनकाटा पूर्णपणे अचूक असल्याचा शेरा दिला.
अधिकारी, प्रतिनिधींची उपस्थिती : तपासणीवेळी पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, विशेष लेखा परीक्षक, तसेच लेखापरीक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर सत्यजित घाडगे, केनयार्ड सुपरव्हायझर विजय मोहिते यांच्यासह कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.