गृहलक्ष्मीचा सन्मान अन् कुटुंबाच्या भाग्योदयात नरेडकोचा मोलाचा वाटा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सौ. उत्तराताई भोसले; नरेडकोच्या ‘होमथॉन 1.0’ची उत्साहात सांगता

कराड/प्रतिनिधी : – 

घराला खऱ्या अर्थाने घरपण देण्याचे काम स्त्री करते. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार घर सजवून ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ बनते. घर हे प्रत्येक स्त्रीचे स्वतःचे विश्व असते, ही भावना लक्षात घेऊन नरेडकोसारख्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होमथॉन 1.0’ या भव्य एक्सपोच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. गृहलक्ष्मीचा सन्मान करत तिच्या कुटुंबाच्या होणाऱ्या भाग्योदयात नरेडकोचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन कृष्णा उद्योग समूहाच्या सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब) यांनी केले.

‘होमथॉन 1.0’ एक्स्पोची सांगता : मलकापूर (कराड) येथे 23 ते 27 जानेवारी दरम्यान नरेडको (NAREDCO) संस्थेच्या वतीने आयोजित भव्य ‘होमथॉन 1.0’ प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोच्या सांगता सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे होते. यावेळी नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले, उपाध्यक्ष सुभाष लोंढे, सौ. शर्मिष्ठा खबाले, व्हिजन डेव्हलपर्सचे प्रशांत चव्हाण, प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

निश्चितच लाभ होईल : कराड व मलकापूरसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांबाबत सौ. भोसले यांनी, समाधान व्यक्त करत नरेडकोच्या कार्याचे कौतुक केले. या एक्सपोमुळे बांधकाम व्यावसायिक, स्टॉलधारक, तसेच ग्राहकांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महिलांचा सन्मान करण्यासाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन केल्याबद्दल नरेडको संस्थेचे त्यांनी विशेष आभार मानले.

यशस्वी प्रयत्न : अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे म्हणाले, पुणे व मुंबईसारख्या महानगरांच्या धर्तीवर कराडमध्ये भरविण्यात आलेला ‘होमथॉन 1.0’ एक्सपो अभिमानास्पद आहे. ग्रामीण व निमशहरी भागात असे उपक्रम राबवणे खर्चिक असले, तरी नरेडकोने ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. ज्या यशवंत भूमीने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले, त्या भूमीत सेवा देणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. याच भूमीत सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न नरेडकोने केल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

स्त्रीसोबत पुरुषाचाही सन्मान व्हायला हवा : घराला घरपण देणाऱ्या स्त्रीची भूमिका अत्यंत मौल्यवान असते; मात्र त्या घराच्या उभारणीसाठी दिवस-रात्र परिश्रम करणाऱ्या पुरुषाचाही सन्मान व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महिला सुरक्षित राहतील : नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, सोसायटीला कुटुंब म्हणून सहकार्याची भूमिका ठेवावी, तसेच मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना अधिकारी बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. कराडमधील सर्व महिला सुरक्षित राहतील, अन्याय अथवा अत्याचार झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाही श्री. दराडे यांनी दिली.

उद्देश : प्रास्ताविकात नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांनी, ‘होमथॉन 1.0’च्या यशस्वीतेचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी जपत बांधकाम क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिक व ग्राहकांना लाभ होईल, या उद्देशाने हा एक्सपो आयोजित करण्यात आला असून, पंचक्रोशीतील व्यावसायिकांच्या सहकार्यामुळे तो यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे भाग्य : स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे नमूद करत, भविष्यात हा एक्सपो सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य संस्थेला लाभल्याचे श्री. खबाले यांनी सांगितले.

स्त्रीसन्मानाचा सण : मनोगतात शर्मिष्ठा खबाले यांनी, प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्वांचे आभार मानले. या एक्सपोच्या माध्यमातून घर खरेदी करताना महिलांना मिळणारा मान अधोरेखित झाला असून, हा स्त्रीसन्मानाचा सण असल्याचे त्यांनी सांगितले.

समाधान : पैठणी विजेत्या स्वाती साळुंखे यांनी, गृहपयोगी सर्व माहिती एकाच छताखाली मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

जबाबदारी द्या : स्टॉलधारक संदीप पवार यांनी अपेक्षेपेक्षा एक्सपो अधिक यशस्वी झाल्याचे सांगून पुढील वर्षी आयोजनात स्टॉलधारकांना अधिक जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सन्मान : प्रदर्शनात सहकार्य केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंटचे विद्यार्थीसुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सागर कुंभार यांनी आभार मानले.

आदर्श स्टॉलधारकांचा सन्मान

‘होमथॉन 1.0’ एक्सपोमध्ये सहभागी आदर्श स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात बिल्डर कॅटेगरीमध्ये : वृंदावन सिटी, मलकापूर, एक्सॉन इन्फ्रा एलएलपी व केएसटी कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल कॅटेगरीमध्ये : जी. के. ट्रेडर्स, के. पी. स्टील (राजुरी स्टील) व समृद्धी कमॉडिटीज या प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पैठणी व नेकलेस विजेत्यांचा सन्मान

23 ते 27 जानेवारी दरम्यान एक्सपोला भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेला कुपन देण्यात आले. त्यातून निवड झालेल्या महिलांना सौ. उत्तराताई भोसले यांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला. पैठणी विजेत्या : स्वाती अजित साळुंखे, मेघा अमोल थोरात, प्रतीक्षा नितीन जाधव, सुजाता परेश जाधव, ज्योती वाढते, तेजल राहुल पवार, नीलम प्रशांत काजारी, शुभांगी अमरसिंह पाटील, तसेच उपस्थित महिलांमधून चिट्टीद्वारे निवड झालेल्या अदिती वर्मा यांना पैठणी व नेकलेस देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!