पालकमंत्री शंभूराज देसाई; कराडमध्ये भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोचा उत्साहात शुभारंभ
कराड/प्रतिनिधी : –
कराड, पाटण, माण-खटाव यांसारख्या शहरी व निमशहरी भागात नरेडको (NAREDCO) या संस्थेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात सुरू असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून, नरेडकोने आयोजित केलेले ‘होमथॉन 1.0’ हे भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल प्रदर्शन जिल्ह्यातील लहान-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व खणीकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
उद्घाटन : कराड येथील मलकापूर परिसरात नरेडको संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होमथॉन 1.0’ या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मलकापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले, उपनगराध्यक्ष लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर व बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत : यावेळी बोलताना पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रात झपाट्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, त्याचा प्रभावी वापर करून परवडणारी व दर्जेदार घरे उभारण्याचे काम नरेडकोसारख्या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. या प्रदर्शनात अत्याधुनिक बांधकाम साहित्य, नव्या संकल्पना व तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनाही मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक खिडकी योजना आवश्यक : माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, काळानुरूप बांधकाम क्षेत्रात मोठे बदल होत असून, नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकांना विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या दूर करण्यासाठी एक खिडकी योजना राबविणे आवश्यक असून, या अडचणी व्यावसायिकांनी लेखी स्वरूपात शासनाकडे सादर कराव्यात. यावर पालकमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष कौतुक : नरेडको संस्थेच्या सामाजिक बांधिलकीसह पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. शहराच्या आधुनिक विकासात बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोलाचे असून, वाढत्या शहरीकरणात नागरिकांनीही नियमांचे पालन करून पालिका प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोठी पर्वणी : कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड व मलकापूर या दोन्ही नगरपालिकांचे नगराध्यक्ष अभियंते असल्याने नरेडको संस्थेसह या प्रदर्शनास उत्तम सहकार्य मिळेल. एकाच छताखाली बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व संकल्पना पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली असून, ही बाब बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांसाठीही मोठी पर्वणी ठरणार आहे.
म्हाडासारख्या योजनांची अंमलबजावणी : वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यातून पालिका प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता, नागरिकांना सुशोभीकरणासह मूलभूत सुविधा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी मुक्त शहराच्या दिशेने वाटचाल करताना म्हाडासारख्या योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेच्या वतीने स्वतंत्र स्टॉल लावण्यात आल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
अत्यंत मार्गदर्शक : मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांनी, शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोठे योगदान असल्याचे सांगून, आज अनेक तरुण या क्षेत्रात उतरून स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. अशा नवउद्योजकांसाठी ‘होमथॉन 1.0’ हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त बैठक लवकरच : उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, कराड व मलकापूर ही वेगाने विकसित होणारी शहरे असून, मलकापूर नगरपंचायतीच्या काळात शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला, त्याचा मोठा फायदा बांधकाम व्यवसायाला झाला आहे. विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करताना नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात गार्डन व भाजी मार्केट यांसारख्या सुविधा आरक्षित जागेतून विकसित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.












