रामकृष्ण वेताळ यांचे राजकीय खच्चीकरण? पत्नीला तिकीट नाकारल्याने उत्तरेत संताप, वरिष्ठांचे मौन चर्चेचा विषय

राजेंद्र मोहिते / कराड : –
लोकसभा, तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर करण्यात मोलाचा वाटा उचलणारे, उत्तरेतील निष्ठावंत आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रामकृष्ण वेताळ यांच्यावर राजकीय द्वेषातून अन्याय झाल्याची भावना सध्या कराड उत्तर मतदारसंघात तीव्र होत आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या रामकृष्ण वेताळ यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे.
पक्षांतर्गत असंतोषाचा स्फोट : भाजपसाठी निष्ठेने काम करणाऱ्या वेताळ कुटुंबावर झालेल्या या निर्णयामुळे समर्थकांमध्ये मोठा रोष असून, सौ. विद्या वेताळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत अन्यायाविरोधात थेट लढा उभारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. हा निर्णय म्हणजे पक्षांतर्गत असंतोषाचा स्फोट असून, उत्तरेतील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तरेत मजबूत संघटन : रामकृष्ण वेताळ यांनी भाजपच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाचा भक्कम पाया रचला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, कृषीविषयक योजना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आणि संघटनात्मक उपक्रमात सक्रिय भूमिका बजावत त्यांनी उत्तरेत मजबूत संघटन उभे केले आहे.
महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या : या कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस, तसेच कृषी संपर्क समन्वयक या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या. हजारो युवकांना पक्षाशी जोडत त्यांनी उत्तरेत एक प्रकारचा राजकीय झंजावात निर्माण केला. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीवर राज्यमंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. यावरूनच उत्तरेतील त्यांच्या वाढत्या वर्चस्वाचे स्पष्ट संकेत मिळत होते.
राजकीय आकसातून खच्चीकरण : मात्र, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली ठाम विरोधी भूमिका आणि उत्तरेतील वाढते राजकीय बळ हेच त्यांच्या अडचणीचे कारण ठरल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरेतील नेत्यांनी राजकीय आकसातून त्यांचे खच्चीकरण करण्याचा डाव रचत सौ. विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे.
वरिष्ठांची ठोस भूमिका नाही : विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून अद्याप ठोस भूमिका समोर आलेली नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड उत्तरमधील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या उमेदवारीबाबत सर्वाधिकार आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनीही याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. वरिष्ठांचे हे मौनच उत्तरेतील जनतेत अधिक संभ्रम आणि नाराजी निर्माण करत आहे.












