कराडमध्ये ‘होमथॉन 1.0’चा उद्या भव्य शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नॅरेडको कराडतर्फे प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पो; महिलांसाठी सन्मान व मेगा लकी ड्रॉचे आकर्षण

कराड/प्रतिनिधी : –

कराडच्या बांधकाम, रिअल इस्टेट व गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणारा भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पो – ‘होमथॉन 1.0’ नॅरेडको कराड यांच्यावतीने आयोजित करण्यात आला असून, हा एक्स्पो दि. 23 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत बैल बाजार रोड, गणपती मंदिर शेजारी, मलकापूर (कराड) येथे होणार आहे. कराड व परिसरातील नागरिकांसाठी घरखरेदी, गुंतवणूक व आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाची ही एक मोठी संधी ठरणार आहे.

उद्घाटन सोहळा : या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी 4 वाजता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते होणार असून, पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कराड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मलकापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तेजस सोनवले व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण : या एक्स्पोमध्ये घर, फ्लॅट, प्लॉट, निवासी व व्यावसायिक प्रकल्प, तसेच आधुनिक बांधकाम साहित्य, नवे तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना थेट बांधकाम व्यावसायिक, विकासक व साहित्य उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असून, एक्स्पोदरम्यान घर किंवा बांधकाम साहित्य खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर्स उपलब्ध असणार आहेत.

महिलांसाठी विशेष सन्मान व मेगा लकी ड्रॉ : घराच्या उभारणीत महिलांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन या प्रदर्शनात महिलांसाठी विशेष सन्मान व मेगा लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेला विनामूल्य कूपन देण्यात येणार असून, त्यातून आकर्षक बक्षिसांची संधी मिळणार आहे.

पैठणी व सोन्याचा नेकलेस : यामध्ये दहा महिलांना ओरिजिनल पैठणी साडी, तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला पैठणीसह 1 ग्रॅम सोन्याचा नेकलेस देण्यात येणार आहे. हा मेगा लकी ड्रॉ दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार असून, कृष्णा उद्योग समूहाच्या प्रमुख आदरणीय सौ. उत्तरा भोसले (आईसाहेब) यांच्या हस्ते पार पडणार आहे.

अनोखी पर्वणी : ‘होमथॉन 1.0’ हा उपक्रम कराड व परिसरातील नागरिकांसाठी केवळ प्रदर्शन न राहता घरखरेदी, बांधकाम, गुंतवणूक आणि महिलांसाठी सन्मानाची एक अनोखी पर्वणी ठरणार असून, कराडच्या बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास नॅरेडको कराडचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांनी व्यक्त केला.

सक्रिय सहभाग : या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नॅरेडको कराडचे उपाध्यक्ष सुभाष लोंढे हे विशेष प्रयत्नशील असून, सचिव संदीप शिंदे, खजिनदार अजित पाटील तसेच संचालक मंडळातील किशोरकुमार साळुंखे, पंकज बागल, प्रशांत मोहिते, विजय जगताप, मंगेश हिरवे, रविराज शिंदे, अजित साळुंखे, धनंजय येडगे, सौरभ तवटे, मच्छिंद्र कुंभार, विजय गायकवाड, विक्रम घारे, अनुराज थोरात, प्रवीण पाटील आदी मान्यवर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घेत आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!