कराडमध्ये भव्य ई-कचरा संकलन व जनजागृती अभियान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

२६ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजन; पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित

कराड/प्रतिनिधी : –

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजेच ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहर व परिसरात दि. २६ ते २८ जानेवारी दरम्यान भव्य ई-कचरा संकलन व जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

सहभाग : कराड नगरपालिकेच्या सहकार्याने आणि पुर्णम् इकोव्हिजन, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सुखायु फाऊंडेशन, गांधी फाऊंडेशन, शिक्षण मंडळ कराड, प्रीतिसंगम हास्य परिवार, रोटरी क्लब ऑफ कराड, जनकल्याण प्रतिष्ठान, इन्व्हायरो फ्रेंड नेचर ग्रुप, जनजाती कल्याण आश्रम, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज, संतकृपा शिक्षण संस्था, चैतन्य संस्कार वर्ग, लायन्स क्लब यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणप्रेमी संस्था सहभागी होणार आहेत.

मुख्य उद्देश : ई-कचऱ्यामुळे हवा, पाणी व मातीचे प्रदूषण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या ई-कचऱ्याची शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फत योग्य विल्हेवाट लावणे, तसेच त्यातील दुरुस्त करता येणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करून त्या वंचित घटकांसाठी कार्यरत सेवाभावी संस्थांना मोफत उपलब्ध करून देणे आणि ई-कचऱ्याबाबत व्यापक जनजागृती घडवून आणणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

काय जमा कराल : या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरातील जुनी, खराब अथवा न वापरलेली विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की फ्रिज, रेडिओ, टेपरेकॉर्डर, डीव्हीडी व सीडी प्लेअर, वायर, हेडफोन, म्युझिक सिस्टीम, चार्जर, केबल्स, बॅटऱ्या, प्रिंटर, ऑडिओ कॅसेट, टेबल लॅम्प, संगणक, मोबाईल फोन, टीव्ही, मिक्सर, पंखा, इस्त्री आदी वस्तू जवळच्या ई-कचरा संकलन केंद्रावर २६ ते २८ जानेवारी दरम्यान जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवाहन : पर्यावरण रक्षणासाठी ही मोहीम केवळ संकलनापुरती मर्यादित न राहता एक लोकचळवळ ठरावी, यासाठी कराडमधील सर्व पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!