रविवारी विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; साई भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने कराड येथे श्री साई पालखी स्नेहसोहळा २०२६ भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. श्री साई पालखी सोहळा समिती, कराड यांच्या वतीने रविवारी (दि. ११) जानेवारी रोजी या भव्य स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, कराडचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह शं. देसाई यांनी केले आहे.
विशेष मार्गदर्शन : या स्नेहसोहळ्यास श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गोखरजी गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प. पू. गोविंद रानडे (नामस्मरण, कोल्हापूर) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : याशिवाय या कार्यक्रमास सुरेशराव चव्हाण, दिलीप रोहम, प्रकाशशेठ कुटवडकर, डॉ. संजय सावंत, जयसिंह पवार, अनिल शिंदे, शिवाजी कुंडलकर, विनोद शहा, दिलीपशेठ यादव, रविंद्र ओहरे, सुभाषभाई शहा, राजेंद्र ओहरे आदी साईभक्त मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा : कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.१५ वाजता श्री साई काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर संतकवी दासगणू महाराज विरचित श्री साईनाथ सत्संगसरी वाचन, श्री साई पादुकांचा महाअभिषेक, श्री साईसच्चरित्र महापूजा, सामुदायिक पारायण व गुरुपादुका अभंग असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
दुपारचे सत्र : या कार्यक्रमात दुपारच्या सत्रात आरोग्यविषयक मार्गदर्शन, दीप प्रज्वलन व मान्यवरांचे विचार होणार असून, दुपारी २ वाजता श्री साई माध्यान्ह आरती व त्यानंतर साईंचा महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळचे सत्र : सायंकाळी ‘झाले तुझे दर्शन साई’ हा मराठी-हिंदी साई भजनांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.
कार्यक्रम स्थळ : हा भक्ती, सेवा व स्नेह यांचा संगम असलेला सोहळा पंकज मल्टिपर्पज हॉल, पुणे-बंगळूर हायवे, कराड येथे होणार आहे.
आवाहन : साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साई पालखी सोहळा समिती, कराड यांच्यावतीने करण्यात आले आहे.