सामाजिक जाणिवेतून कराड मर्चंट परिवाराची स्वर्गरथ निर्मिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

कराड/प्रतिनिधी : – 

सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कराड मर्चंट परिवार व मर्चंट प्रतिष्ठानच्या वतीने समाजोपयोगी स्वर्गरथाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. ९) रोजी सकाळी ९.४५ वाजता शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी येथे संपन्न होणार आहे. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे.

समाजऋणाची जाणीव : कराड व परिसरात एखाद्या व्यक्तीचे दुःखद निधन झाल्यास मयत व्यक्तीस स्मशानभूमीपर्यंत सन्मानाने नेण्यासाठी समाजऋणाची जाणीव ठेवून हा स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर वापर : मर्चंट परिवाराचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांनी समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना उपयोगी पडणारा उपक्रम राबवला असून, स्वर्गरथाचा वापर ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात येणार आहे.

समाजहितासाठी विविध उपक्रम : मर्चंट परिवाराने यापूर्वीही समाजहितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळातील मदतकार्य, पुरग्रस्तांना दिलेला मदतीचा हात, रिमांड होमसाठी शालेय वर्गांची उभारणी, शिवम प्रतिष्ठानला वृद्धाश्रम युनिट, महावीर गोशाळेसाठी गायींचे शेड, प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयातील सार्वजनिक सुविधा, तसेच जळीतग्रस्तांना आर्थिक मदत ही मर्चंट परिवाराची समाजसेवेची ओळख ठरली आहे.

नवी ऊर्जा : स्वर्गरथाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, या उपक्रमासाठी विविध संस्था, सभासद, संचालक व सेवकांनी सहकार्य केल्याबद्दल मर्चंट परिवाराने त्यांचे आभार मानले आहेत. अशा उपक्रमांमुळे सार्वजनिकहित जोपासण्याची नवी ऊर्जा निर्माण होत असल्याचेही सत्यनारायण मिणीयार यांनी सांगितले.

प्रमुख मान्यवर : लोकार्पण सोहळ्यास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, सहकारी संस्था कराडच्या उपनिबंधक अपर्णा यादव, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे व स्वप्निल कदम, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह मर्चंट कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराड मर्चंटचे चेअरमन माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, लक्ष्मीकांत मिणीयार, महिला मर्चंटच्या संस्थापिका सौ. भारती मिणीयार, चेअरमन कविता पवार, व्हा. चेअरमन सुवर्णा सादिकले, तसेच मर्चंट परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!