मार्ग वेगळे, शेतकऱ्यांसाठीची लढाई एकच; साताऱ्यात भावनिक क्षण, आंदोलनाच्या आठवणींनी सातारा न्यायालय गहिवरले
कराड/प्रतिनिधी : –
कधीकाळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकसंध उभी राहिलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना कालांतराने वेगवेगळ्या गटांत विभागली गेली असली, तरी आंदोलनाच्या संघर्षातून तयार झालेले नाते आजही तुटलेले नाही, याची भावनिक प्रचिती सातारा न्यायालय परिसरात सोमवारी पाहायला मिळाली.
शंभराव्या गुन्ह्याची सुनावणी : २०१२ मधील ऊस आंदोलनासंदर्भात दाखल झालेल्या शेवटच्या शंभराव्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत सातारा न्यायालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी संघटनेचे सचिन नलवडे यांना त्यांनी संपर्क साधून आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंजाबराव पाटील उपस्थित का नाहीत, अशी विचारणा केली. पाटील आजारी असल्याचे समजताच खोत यांनी आपला प्रवास थांबवून थेट टाळगाव गाठले.












