आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर; वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
कराड/प्रतिनिधी : –
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी अचानक भेट देत पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, सुविधा आणि सुरू असलेले नव्या इमारतीच्या कामाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवेबाबत विचारणा केली असता, चांगली सेवा मिळते अशा प्रतिक्रिया मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
रुग्णालयांना अचानक भेट : शासनाकडून आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो, मात्र अनेकदा तक्रारी येतात. त्यामुळे मंत्री आबीटकर हे सरकारी रुग्णालयांना अचानक भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. साताऱ्यातील एका लग्न समारंभातून कोल्हापूरकडे जाताना त्यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
विविध कामांसाठी निधीची आवश्यकता : रुग्णालयातील पहिल्या कक्षाची त्यांनी पाहणी केली, तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, इमारतीला रंगरंगोटी यांसारख्या आवश्यक सूचना केल्या. नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीला लाळे यांनी उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर मंत्री आबीटकर यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करत मुंबईला गेल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ : रुग्णालयातील कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कराड हे साताऱ्याइतकंच महत्त्वाचं केंद्र असून, येथे मिळणाऱ्या आरोग्य सेवेत सकारात्मक बदल जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयाच्या रंगकामासाठी निधी मागणी करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
प्रमुख उपस्थिती : या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी. पाटील, डॉ. अमित ठिगळे, डॉ. प्रशांत देसाई, तसेच आरोग्य कर्मचारी सुवर्णा जेठीथोर, आयेशा शेख, रेखा यादव, संतोष शेटे, प्रा. बाजीराव पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.
सुधारणा प्रक्रियेला गती : आरोग्यमंत्री आबीटकर यांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात हलचल निर्माण झाली असून, रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांमुळे सुधारणा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.