दादासाहेब मोकाशींनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण केल्या

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील; दादासाहेब मोकाशी यांची ७६ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

कराड/प्रतिनिधी : –

कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, यंत्र आणि तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्रात उपलब्ध संधींचा लाभ घेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळवत अधिकारी पदांवरही मजल मारली आहे. ग्रामीण भागातील अशाच विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण करण्यात स्व. दादासाहेब मोकाशी यांनी आयुष्य वाहिले, त्यांच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केले.

जयंती कार्यक्रम : राजमाची (ता. कराड) येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान व शैक्षणिक संकुलात स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनव प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होते.

स्पर्धा परीक्षांमध्ये अमर्याद संधी : कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृषी उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप्स आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे सांगत उपअधीक्षक पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील शिक्षण न घेता विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःमधील कलागुण शोधावेत. मोबाईलच्या आभासी जगापासून दूर राहून आई-वडील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आयुष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाचनसंस्कृती जोपासणे आवश्यक : कृषी उद्योजक प्रशांत शेंडे यांनी, डिजिटल युगातील बदलांवर भाष्य केले. २१ व्या शतकातील स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचे असेल तर, वाचनसंस्कृती जोपासणे आवश्यक आहे. वाचन कमी झाल्याने प्रगल्भता घटते आहे. ज्ञानाची भूक वाढवल्याशिवाय मोठेपणा येत नाही, असे त्यांनी सांगितले.

सायबर क्राईमचे चक्रव्यूह : कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी, शालेय स्पर्धांमुळे अपयश स्विकारण्याची शक्ती मिळते. यश-अपयशाचा विचार न करता प्रयत्नांची पराकाष्टा करा. सायबर क्राईमचे चक्रव्यूह धोकादायक आहे. मोबाईलचा योग्य वापर करा. शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांवरच यशाची उभारणी होते, असे मत व्यक्ती केले.

आई-वडिलांची स्वप्नपूर्ती हीच कृतज्ञता : विद्यार्थ्यांना समाजमनाचा आरसा दाखवताना कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार म्हणाले, चारित्र्य हीच खरी ओळख आहे. आपण माणूस म्हणून वागतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. संस्कार, परंपरा आणि संस्कृती माणूस घडवतात. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे अनेकांचे करिअर बिघडते. आई-वडिलांचे कष्ट ओळखून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही खरी कृतज्ञता. कोणतेही दुष्कृत्य करताना आई-वडिलांचे कष्ट, त्यांच्या परिस्थिती याची जाणीव ठेवा. त्यांच्या डोळ्यात तुमच्या भवितव्याचे स्वप्न दिसेल, ते पूर्ण करताना दुःखाचे नाही तर, सुखाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात यायला हवेत, तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असे त्यांनी सांगितले.

सत्कार : या प्रसंगी मोकाशी शैक्षणिक संकुलातील सौरभ सुरवसे याची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. दुधोंडी येथील विद्यार्थी प्रणव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यावर अर्थपूर्ण मनोगत व्यक्त केले.

प्रदर्शनास भेट : कार्यक्रमानिमित्त आयोजित स्पर्धेतील निवडक चित्र व निबंध प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास संस्थेचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी, उपविभागीय अभियंता अक्षय देसाई, तालुका कृषी अधिकारी प्रसाद शेंडे, राजमाचीचे सरपंच दादासो डुबल, प्राचार्य पी.पी. पाटील, प्राचार्य सौ. पवार, प्राचार्य किरण घटुगडे, तसेच प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व आभार : मान्यवरांचे स्वागत करून प्रा. सूर्यवंशी मॅडम यांनी प्रास्तावित केले, तर सूत्रसंचालन करून प्रा. माने सर यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!