‘सियाचीन विजयगाथे’ने कराडकरांच्या मनात जागवली देशभक्तीची जाज्वल्य ज्योत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ले. जनरल संजय कुलकर्णींचे थरारक अनुभवकथन ऐकून भारावले नागरिक व विद्यार्थी

कराड/प्रतिनिधी : –

जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रिजरेशन्स कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सियाचीनची विजयगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमात भारतीय सैन्यदलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल, माजी महासंचालक व ‘सियाचीनचे नायक’ म्हणून गौरवले गेलेले संजय कुलकर्णी यांनी आपल्या थरारक अनुभवकथनाने उपस्थित कराडकर नागरिक व सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोमांचित करून टाकले.

मोहिमेचा प्रत्यक्ष साक्षीदार : १९८४ साली हिमालयातील उंचावरील सियाचीन ग्लेशिअरवर भारतीय सैन्याने केलेल्या मोहिमेचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून ले. जनरल संजय कुलकर्णी यांनी प्रतिकूल हवामान, ऋण तापमान, मृत्यूशी झुंज, हेलिकॉप्टरच्या मर्यादा, सतत बदलणारे वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजन या सर्वांचा थरारक पट त्यांच्या शब्दांत उलगडला. सैन्यदलातील सहकाऱ्यांवरील विश्वास, संयम, धैर्य आणि युक्ती यांच्या बळावरच भारतीय जवानांनी १३ एप्रिल १९८४ रोजी सियाचीनवर ताबा मिळवला, असे त्यांनी सांगितले.

अनेक पदकांसह पुरस्कारांनी सन्मान : “सैनिकाचे आयुष्य हे फक्त रणांगणापुरते मर्यादित नसते; तर प्रत्येक क्षणी देशाचे रक्षण करण्याचा संकल्प असतो,” असे सांगत त्यांनी तरुणांना प्रेरित केले. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना शौर्य पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

तरुणाईसमोर जिवंत आदर्श : कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री रेफ्रिजरेशन्सचे अध्यक्ष रवळनाथ शेंडे यांनी, प्रत्येक भारतीयाला आपल्या सैनिकांचा अभिमान आहे. अशा कार्यक्रमांमुळे तरुणाईसमोर जिवंत आदर्श उभा राहतो, असे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना प्रेरणा : जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांनी, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.

सन्मान : प्रारंभी, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शिरीष गोडबोले व रवळनाथ शेंडे यांच्याहस्ते ले. जनरल संजय कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.

उत्स्फूर्त प्रतिसाद : पाहुण्यांचा परिचय सौ. रुपाली तोडकर, सूत्रसंचालन प्रथमेश इनामदार, तर सोनाली जोशी यांनी आभार मानले. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गगनभेदी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला कराड शहरातील नागरिक, प्रतिष्ठानचे संचालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!