कराड/प्रतिनिधी : –
नवचैतन्य युवक गणेश मंडळ, बेलवडे बुद्रुक (ता. कराड) यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकात गावातील केवळ तीन वर्षांची शिवकन्या कुमारी हिंदवी अजित मोहिते हिने दिलेली दमदार कामगिरी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिच्या धाडसी सादरीकरणाने उपस्थित ग्रामस्थ व गणेशभक्त भारावून गेले.
प्रात्यक्षिकानंतर “जय भवानी – जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हिंदुतेज दांडपट्टा ग्रुप, जखिनवाडी यांच्या सहयोगाने रंगविण्यात आलेल्या या कार्यक्रमात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. मराठ्यांचा शौर्यगौरव व संस्कृतीचे दर्शन घडविणारे दांडपट्टा, लाठी-काठीसह विविध मर्दानी खेळ पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
याप्रसंगी कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप, लिगाडे पाटील सायन्स कॉलेज कराडचे प्रमुख लिगाडे सर, सरपंच डॉ. सुशांत मोहिते, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते (आबा), जयवंत मोहिते (दादा), ॲड. वसंतराव मोहिते, ग्रामपंचायत अधिकारी अण्णासाहेब खांडके, पोलिस पाटील कुंभार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाच्या भव्यतेत भर टाकली. विशेषत: लहानग्या हिंदवी मोहितेच्या धाडसी प्रात्यक्षिकाने संपूर्ण बेलवडे बुद्रुकमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.











