कराडमध्ये अवतरणार दिल्लीचा ‘राजपथ आणि इंडिया गेट’ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराडतर्फे प्रजासत्ताकदिनी ‘संविधान रॅलीचे आयोजन; भव्य चित्ररथाचीही निर्मिती 

कराड/प्रतिनिधी : – 

येथील अग्रगण्य कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सतर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यंदा विद्यार्थ्यांची भव्य संविधान रॅली काढण्यात येणार असून, दिल्लीच्या राजपथ व इंडिया गेटच्या हुबेहूब प्रतिकृतींसह विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे यांनी दिली.

कराडकरांसाठी उपक्रम आकर्षण ठरणार : संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम कराडकरांसाठी आकर्षण ठरणार असल्याचे श्री. खुस्पे यांनी सांगितले.

पत्रकार परिषद : कोटा ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित पत्रकार दिन सन्मान सोहळा व प्रजासत्ताक दिनाच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. मंजिरी खुस्पे, सचिव अॅड. सतीश पाटील उपस्थित होते.

भव्य रॅली : प्रजासत्ताक दिनाच्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना श्री. खुस्पे म्हणाले, संविधानातील लोकशाही मूल्ये, हक्क व कर्तव्यांची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. संविधानाची प्रतिकृती, विषयानुरूप फलक व घोषणांद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

राजपथाची भव्य प्रतिकृती : दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाचा अनुभव स्थानिक पातळीवर मिळावा, यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये राजपथाची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. विद्यार्थी व नागरिकांना राजधानीतील सोहळ्याची अनुभूती मिळावी, यासाठी कॉलेज परिसरात इंडिया गेटची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

देशभक्तीपर नृत्याविष्कार : ‘विविधतेतून एकता’ या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर नृत्याविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर केले जाणार असून, रॅलीदरम्यान परिसरातील तीन प्रमुख ठिकाणी हे सादरीकरण होणार आहे. दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे ध्वजारोहणानंतर सर्व उपक्रमांना प्रारंभ होईल.

नियोजन : या सर्व कार्यक्रमांचे नियोजन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्षा सौ. मंजिरी खुस्पे, सचिव अॅड. सतीश पाटील आणि संचालिका कुमारी मैथिली खुस्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

आवाहन : या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी कराडमधील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे त्यांनी यावेळी केले.

पत्रकारांचा सन्मान : पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार करून पत्रकार दिन व मकर संक्रांतीच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांकडून वेळोवेळी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या विविध उपक्रमांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!