ऊसतोड मजूर व माता-बालकांची मोफत आरोग्य तपासणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कृष्णा कारखान्याच्या उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल १५८ जणांची तपासणी व मोफत औषधोपचार

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, येडेमच्छिंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार, तसेच माता-बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला कामगार व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल १५८ जणांची सखोल आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.

धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष : शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सुतार म्हणाले, कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. नियमित आरोग्य तपासणी व शरीराची योग्य काळजी घेतल्यास आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे ऊसतोड मजुरांच्या आरोग्य व कल्याणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख उपस्थिती : शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य सेवा : आरोग्य तपासणीसाठी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाठारकर, डॉ. गायत्री जगताप, डॉ. ईश्वर दाभाडे, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम यांनी सेवा दिली. मोलाचे सहकार्य : आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक-सेविका, आशा गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!