कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटुंबीयच सामील असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील पुरावे सादर करत या निवडणूक फसवणुकीचा भंडाफोड केला.
पत्रकार परिषद : यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे आणि राजेंद्र यादव उपस्थित होते.
मतदान चोरी झाली : सैदापूरचे उपसरपंच मोहनराव जाधव म्हणाले, “2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये या बनावट नोंदींचा वापर करून मतदान चोरी झाली. चव्हाण कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे कराड दक्षिण, मलकापूर आणि पाटण मतदारसंघात आढळून आली आहेत. या नावांसाठी वेगवेगळे पत्ते, खोटे वय आणि चुकीची माहिती मतदार नोंदणी फॉर्ममध्ये दाखवण्यात आली आहे.”
एकच पत्त्यावर 15 मतदार : इंद्रजीत पंजाबराव चव्हाण – 2024 च्या निवडणुकीत मुख्य निवडणूक प्रतिनिधी असून, वडिलांचे नाव व वय बदलून दोन मतदारसंघात नोंदणी, आशा इंद्रजीत चव्हाण – कराड येथे वय 47, मलकापूरात 46, तर पाटण मतदारसंघात नाव “आशाताई” वय 44 अशी नोंद व शांतादेवी चव्हाण – कराडमध्ये वय 87, मलकापूरात 86, तसेच अभिजीत इंद्रजीत चव्हाण – मलकापूर येथे दोन वेगवेगळे पत्ते दाखवून नावे नोंदवले, राहुल विजयसिंह चव्हाण – पाटण कॉलनीत वय 53, तर कुंभारगावात वय 52, गौरी राहुल चव्हाण – दोन ठिकाणी नोंदणी, वय बदलून, अधिकराव अण्णासाहेब चव्हाण – दोन ठिकाणी नोंदणी; वडिलांचे नाव ‘अण्णासो’ आणि ‘अण्णासाहेब’ असे वेगवेगळे दाखवले, मंगल अधिकराव चव्हाण – दोन नोंदीत वयातील फरक, राजेश वसंतराव चव्हाण – पाटण कॉलनीत वय 52, कुंभारगावात 56 असे कराड व पाटणमध्ये नऊ जणांची नावे, एकाच पत्त्यावर 15 मतदार आहेत.
फौजदारी कारवाईची मागणी : भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील घराच्या पत्त्यावर एकूण 15 मतदार नोंदवले गेले आहेत. परंतु, यातील बहुतांश लोक प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत नाहीत. भाजपने निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुटुंबीयांकडूनच नियमांचे उल्लंघन : “मतदार पुनर्निरीक्षण समितीचे नेतृत्व करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटुंबीयांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून, तातडीने कारवाई करावी,” असा इशारा भाजपने दिला.