आमदार अतुल भोसलेंच्या स्वीय सहाय्यकांची दोन मतदारसंघात नोंदणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

काँग्रेसनेही केली पोलखोल; चोरी लपविण्यासाठी चोराच्याच उलटा बोंबा असल्याचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुबार मतदार नोंदणीच्या प्रकरणावरून काँग्रेसनेही भाजपवर पलटवार करत टीकेची झोड उठवली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकांचे मतदार यादीत दुबार नाव असल्याचे समोर आणले होते. आता काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पत्रकार परिषद : शुक्रवारी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, “बोगस मतदान लपविण्यासाठी मोठी नावे घेण्याचा प्रकार भाजपकडून केला जात आहे. ही चोरी लपविण्यासाठी चोराच्याच उलटा बोंबा मारले जात आहेत.”

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर, ओबीसी सेलचे भानुदास माळी, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, अजीत पाटील-चिखलीकर आणि रेठरे बुद्रूकचे दिग्विजय पाटील उपस्थित होते.

याला प्रशासन जबाबदार : भाजपच्या आरोपांना उत्तर देताना गजानन आवळकर म्हणाले, “माझे नाव वाठार व कराड अशा दोन ठिकाणी होते. मात्र कराडमधील नाव कमी करण्यासाठी मी अर्ज दिला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली; पण हरकत घेणारेच उपस्थित राहिले नाहीत. तरीही नाव कमी झाले नाही, याला प्रशासन जबाबदार आहे. मी दोनदा मतदान केलेले नाही. आरोप करणाऱ्यांनी आठ दिवसात पुरावा सादर करावा; अन्यथा मी कायदेशीर कारवाई करेन.”

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांच्यावर दुबार मतदानाचे आरोप झाले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझा जन्म कराडचा असून, वास्तव्य बदलल्यामुळे नाव वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये राहिले. मी पाटण कॉलनी, पवार कॉलनी आणि नंतर मलकापूर येथे राहिलो. प्रत्येक वेळी जुन्या नावावरून नाव कमी करण्यासाठी अर्ज केला; पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. माझ्या पत्नी, मुलगा आणि आईचीही दुबार नावे रद्द करण्याची मागणी केली आहे. आम्ही नेहमी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. बोगस मतदानाला आमचा विरोध आहे.”

बोगस मतांची चोरी लपवण्यासाठी खटाटोप : भाजपवर गंभीर आरोप करताना दिग्विजय पाटील म्हणाले, “विद्यमान आमदारांचे दोन स्वीय सहाय्यक – अमोल पाटील (अंकलखोप) आणि फत्तेसिंह सरनोबत (इस्लामपूर) – यांच्या नावांची नोंद त्यांच्या मूळ गावात आणि कराड दक्षिण मतदारसंघात आहे. पाटील तर अंकलखोपचे माजी उपसरपंचही आहेत. भाजप खऱ्या बोगस मतांची चोरी लपविण्यासाठी मोठी नावे घेत आहे.”

फिजिओथेरपी विद्यार्थ्यांचीही मतदारयादीत नोंदणी

कराड येथील फिजिओथेरपी महाविद्यालयातील तब्बल ५२ विद्यार्थ्यांची नोंदणी कराड दक्षिण मतदारसंघात झाली आहे. ही नावे शिवनगर बुथवर दिसत असून, काही निवृत्त कामगारांची नावेही रेठरे बुद्रूकच्या मतदार यादीत आहेत. यावर बोट ठेवत दिग्विजय पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ही खरी मतांची चोरी आहे. त्याचे उत्तर भाजप देऊ शकत नाही, म्हणून उलट काँग्रेसवर बोट दाखवले जात आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!