सुदर्शन पाटसकर यांची पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; कराडमध्ये विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन 

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी व गतिमान सरकारची विकासकामे आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी कराड शहरात सुरु केलेले भारतीय जनता पार्टी विकासपर्व जनसेवा कार्यालय प्रयत्नशील राहणार आहे. निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या सुदर्शन पाटसकर यांची तळमळ आणि पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

उद्घाटन सोहळा : युवा नेते सुदर्शन पाटसकर यांच्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

कराड : विकासपर्व जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समवेत आ. डॉ. अतुलबाबा भोसले, सुदर्शन पाटसकर व उपस्थित मान्यवर.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले, विधानपरिषदेचे आ. विक्रांत पाटील, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, बाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शंकर शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

साताऱ्याला दृष्ट लागू नये : सातारचे खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदारही महायुतीचे असल्याने निर्माण झालेल्या भाजपच्या मजबूत फळीला कोणाचीही दृष्ट लागू नये, असे सांगत ना. बावनकुळे म्हणाले, कराड दक्षिणचा आमदार भाजपचाच असे, हा माझा विश्वास येथील जनतेने सार्थ करून दाखवला. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मोठे परिवर्तन घडवले आहे. आता त्यांनी सांगितलेले एकही काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्याच्या सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पुढील पाच वर्षांत कराड हे राज्यातील सर्वोत्तम शहर असेल, अशी ग्वाही ना. बावनकुळे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसीत महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. तोच पुढे नेण्यासाठी सुदर्शन पाटसकर यांनी विकासपर्व जनेसवा कार्यालय सुरू केले असल्याचे सांगत ना. बावनकुळे यांनी सुदर्शन पाटसकर यांच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावली जातील, असा विश्वास व्यक्त केला.

एकही काम प्रलंबित राहणार नाही : सुदर्शन यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून निवडणूक व करोना काळात केलेल्या कार्याचा अभिमान आहे. त्यांच्या कार्याची नक्कीच दखल घेऊन त्यांनी जनतेचे आणलेले एकही काम मंत्रालय स्तरावर प्रलंबित राहणार नाही, अशीही ग्वाही ना. बावनकुळे यांनी दिली.

शून्य रुपये वीज बिल : तसेच 45 लाख शेतकर्‍यांना शेतीपंपांचे वीज बिल शून्य रुपये येईल. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जनतेला इन्कमटॅक्स भरावा लागणार नाही. लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार असून भविष्यात ती आणखी प्रभावी केली जाणार आहे. 48 तासात जातीचे दाखले, पानंद गाव रस्ते तातडीने खुले केले जातील, असेही ना. बावनकुळे यांनी सांगितले.

वचन पूर्ण करून दाखवले : ना. बावनकुळे यांनी कराड दक्षिणचा आमदार भाजपचा असेल, असे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करून दाखविले. अशा सांगत आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, उर्जामंत्री असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महसूल मंत्रीपदाच्या काळात शंभर दिवस विशेष कामांचा निर्णय घेतला. महसूल विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणली आहे. सुदर्शन पाटसकर यांनी जनतेप्रती घेतलेले सेवावृत व त्यांचे एकूणच कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कराड : कार्यक्रमात बोलताना युवा नेते सुदर्शन पाटसकर, व्यासपीठावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.  डॉ. अतुलबाबा भोसले, उपस्थित मान्यवर, तसेच कार्यक्रमास उपस्थित जनसमुदाय.

…यासाठी विकासपर्व जनसेवेची सुरुवात : प्रास्ताविकात सुदर्शन पाटसकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विकासपर्व जनसेवा कार्यालय सुरु केल्याचे सांगितले.

राजकीय व सामाजिक वारसा : तसेच वडील विष्णू पाटसकर यांच्याकडून मिळालेला राजकीय, सामाजिक वारसा चालवताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष, राज्य सचिव, राज्य उपाध्यक्ष ते आज राज्याचा महामंत्री पर्यंतची केलेली वाटचाल सुदर्शन पाटसकर यांनी सांगितली.

आभार : शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महसूल प्रशासकीय कार्यालयाचे नुतनीकरण

कराड महसूल प्रशासकीय इमारत जुनी झाली असून या इमारतीचे नुतनीकरण करण्याची गरज आहे. यासाठी निधी मिळावा, अशी मागणी आ. डॉ. अतुलबाबा भोसले केली. यावर ना. बावनकुळे यांनी तुमच्यासारख्या दमदार आमदारांनी आणलेली कोणतीही फाईल पेंडिग राहिलेली नाही. महसूलचाही प्रस्ताव द्या, त्यावर तात्काळ सही करतो, अशी ग्वाही दिली.

पीओपी बंदीवर तोडगा काढा

न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींवर बंद घातल्याने कुंभार समाजातील मूर्तीकारांवर संकट ओढवले आहे. यावर तोडगा काडण्याची मागणी सुदर्शन पाटसकर यांनी केली. याच मुद्यावर अतुलबाबांनी पीओपीच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम जलकुंभात विसर्जन केल्यास जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यासाठी पीओपीवरील बंदी उठविण्यासाठी शासन स्तरावर निर्णय व्हावेत, अशी विनंती त्यांनी ना. बावनकुळे यांच्याकडे केली.

अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका लढवू

आ. डॉ. अतुलबाबांनी कराड दक्षिणेत झंझावात निर्माण करून यशश्री खेचून आणली आहे. त्यामुळे त्यांनी आता कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात यावी, आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे सुदर्शन पाटसकर यांनी सांगितले.

स्वच्छ कराडचे कौतुक

कराडमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील स्वच्छता पाहून कौतुक वाटले. हीच स्वच्छता कायम टिकवून शहर स्वच्छ, सुंदर ठेवावे. शहराच्या विकासासाठी आ. डॉ. अतुलबाबांच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करू. तसेच कराडला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनवू, असे आश्वासन ना. बावनकुळे यांनी दिले. 

 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!