उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर; शनिवारी कराडला पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्याचा मेळावा 

कराड/प्रतिनिधी : – 

राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १९) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.

पत्रकार परिषद : पक्षप्रवेशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे प्राध्यापक शरद काटकर, यांच्यासह संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती : शनिवारी दुपारी चार वाजता शामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या मैदानावर पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याचे सांगत अॅड. उंडाळकर म्हणाले, या कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनाली पोळ, प्रदीप विधाते, विजयसिंह यादव, संजय देसाई, सीमा जाधव, राजेश पाटील-वाठारकर, श्रीनिवास शिंदे, सादिक इनामदार, जितेंद्र डुबल यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अखेरपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासली : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेवून ज्येष्ठ नेते (कै.) विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी समाजातील सामान्य जनतेचे नेतृत्व करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरपर्यत केले, असे सांगत अॅड. उंडाळकर म्हणाले, कराड दक्षिण मतदार संघाचे त्यांनी सलग ३५ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना मतदार संघाचा त्यांनी चेहरामोहरा बदलला.

वारणेचे पाणी कृष्णला मिळवले : विशेषतः मतदार संघातील मूलभूत समस्यांची सोडवून करताना जलसिंचनाचा कराड दक्षिण पॅटर्न राबवून वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवून पहिला नदीजोड प्रकल्प साकारला. तालुक्याबरोबर सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेला सत्तेशी दारे खुली करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले, असल्याचे अॅड. उंडाळकर यांनी सांगितले.

पक्षांतर्गतच संघर्ष : २०१४ च्या निवडणुकीत त्यांना कॉग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला, असे सांगत अॅड. उंडाळकर म्हणाले, तरीही त्यांनी राजकारणातील तत्व जोपासत सामान्य माणसाची नाळ शेवटपर्यंत सोडली नाही. त्याच्यानंतर राजकीय सामाजिक वारसा सर्व रयत संघटनेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालवत आहोत. कराड तालुक्यातील सामान्य माणसाचे काकांनी निर्माण केलेले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असून त्यास यशही आले आहे.

कॉग्रेसच्या विचारांशी साधर्म्य : राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता राज्यात असल्याचे सांगताना अॅड. उंडाळकर म्हणाले, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे तालुका, जिल्ह्यात उभे केलेले संघटन, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना राजकीय ताकद मिळण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कॉग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम व ठिकाण : उपमुख्यमंत्री अजितदादा शनिवारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी दुपारी चार वाजता येत असून कराड येथील भाजीपाला मार्केटच्या मैदानावर तालुक्यातील महिला, युवक व जनतेने बहुसंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन अॅड. उंडाळकर यांनी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!