प्रा. ईश्वर रायण्णवर; आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान, शूद्र विचारांनी देशाशी फितूर केली
कराड/प्रतिनिधी : –
समाज परिवर्तन घडवण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी समाज सुधारण्याची मोठी चळवळ उभा केली. त्याच चळवळीला भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. समाज शिक्षणाचा, त्याच्या परिवर्तनाचा ध्यास घेतला. संविधान निर्मितीतून सर्वांना समान अधिकार दिला. त्यामुळे बाबासाहेब कोणत्याही एका समाजाचे नेते नव्हे, राष्ट्रपुरुष नव्हे; तर ते राष्ट्रनिर्माता होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू वक्ते प्रा. ईश्वर रायण्णवर यांनी केले.
व्याख्यान : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भवानी शाखा आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्यावतीने सोमवार (दि. १४) रोजी सायंकाळी आयोजित “राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान” या विषयावरील विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रा.स्व. संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह व लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय ह. जोशी व कराड शहर कार्यवाह महंतेश तुळजणवर प्रमुख उपस्थित होते.
बाबासाहेबांनी हलाहल पचविले : तत्कालीन परिस्थितीत रंजल्या, गांजलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप खस्ता खाल्ल्याचे सांगत प्रा. रायण्णवर म्हणाले, हलाहल पचवलेल्या शिवशंकराप्रमाणे बाबासाहेबांनी अनेक अपमान, अन्याय, अत्याचारांचे विष पचविले आहे.

केवळ राजकारण म्हणूनच वापर : समाजाच्या मुक्तीचे द्वार खुले करण्यासाठी स्वतः शिक्षण घेतले. शिक्षण संस्था सुरू केल्या. करुणा युक्त अंतकरणाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची अट घातली. वृत्तपत्र स्थापन करून समाजजागृती केली. ‘संघटित व्हा आणि संघर्ष करा’, या त्यांच्या वक्तव्यामागे समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी संघर्ष करा, असा अर्थ होता. मात्र, यांसह त्यांच्या अन्य वक्तव्ये, विचारांचा तत्कालीन राजकारण्यांनी केवळ राजकारण म्हणूनच वापर केल्याचे प्रा. रायण्णवर यांनी सांगितले.
बाबासाहेबांना मानणाऱ्यांनीच बांधून ठेवले : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न तत्कालीन राजकारण्यांनी केला, असे सांगत प्रा. रायण्णवर म्हणाले, बाबासाहेबांना आपले मानणाऱ्यांनी त्यांना आपल्या कवेत साखळदंडाने बांधून ठेवले आणि इतरांनीही त्यांना त्याच दृष्टीने पाहिले. मात्र, बाबासाहेबांचे चरित्र जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मनातील पूर्वग्रह दूर केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्पष्ट भूमिका : ‘हिंदु म्हणून जन्मलो. परंतु, हिंदु म्हणून मरणार नाही’, असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी राष्ट्रीयतेच्या कक्षा ओलांडून धर्मांतर करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. असे सांगत प्रा. म्हणाले, काही वर्गाने बाबासाहेबांनी हिंदुंवर अन्याय केल्याचे म्हटले. मात्र, अशावेळी हिंदुंचा उपकारकर्मा म्हणून हा समाज माझा उल्लेख करेल, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. तो दिवस आला आहे, असे प्रा. रायण्णवर यांनी सांगितले.
धर्म उद्ध्वस्त करणे म्हणजे सेक्युलिझम नाही : फाळणीवेळी बाबासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना प्रा. रायण्णवर म्हणाले, पाकिस्तानात असलेल्या दलित, हिंदुंनी भारतात यावे, असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते. स्वातंत्र्यानंतर एका पाकिस्तानशी लढायला ७५ वर्षे गेली. मग जर भारताच्या पोटात दलितिस्थान निर्माण झाला असता; तर काय झाले असते, हे जाणले पाहिजे. धर्म उद्ध्वस्त करणे म्हणजे सेक्युलिझम नाही. मला राजकारणापेक्षा धर्मकारण जास्त प्रिय आहे, असे बाबासाहेब म्हणायचे.
शूद्र विचारांनी फितूर केली : धर्मचिकित्सेच्या आधाराने बाबासाहेबांनी अभ्यास केला होता. एखाद्या प्रख्यात पंडितापेक्षा त्यांना धर्माचे जास्त ज्ञान होते. त्यांनी लेखणीतून ब्रिटिश राज्यव्यवस्थेचे बुरखे फाडले. मात्र, शूद्र विचारांनी देशाशी फितूर केली, हे स्वातंत्र्य गमाविण्यामागेचे कारण आहे. बाबासाहेबांची राष्ट्रनिष्ठा ही संविधानातून दिसून येते, असेही प्रा. रायण्णवर यांनी सांगितले.
…हे त्या समाजाचे पाप : बाबासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहेत. मात्र, समाजाच्या एका व्यापक वर्गाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले नाही, हे त्या समाजाचे पाप आहे, अशी टिप्पणी करत बाबासाहेबांचे जीवन मोठ्या अंतकरणाने अनुभवून प्रायचित्त केले पाहिजे, असे मतही प्रा. ईश्वर रायण्णवर यांनी व्यक्त केले.
बुद्धवंदना : प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, तसेच राजेंद्र आलोंणे यांनी सादर केलेली बुद्धवंदना व वीरेंद्र साने यांनी सादर केलेल्या पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक वैद्य मिहीर वाचासुंदर यांनी, परिचय शिरीष एकांडे यांनी, तर सूत्रसंचालन विक्रम पवार यांनी केले. आनंदराव कलबुर्गी यांनी बाबासाहेबांवरील कविता सादर केली. महंतेश तुळजणवर यांनी आभार मानले. कार्यक्रमास रा.स्व. संघ आणि लोककल्याण मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच राष्ट्रीय विचारांचे नागरिक, महिला, युवक, युवती उपस्थित होते.
हिंदुंबाबत एक विचार
‘सर्व हिंदूंची एक जात आहे’, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. हेडगेवारांनीही ‘हिंदू सारा एक आहे’, असेच सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांची सुरुवात वेगवेगळी असली, तरी त्यांचे विचार एक होते. असे मत प्रा. रायण्णवर यांनी व्यक्त केले.
अतिवादी हिंदुत्व मोठी समस्या
काही लोक भावनेच्या भरात समाजाला विध्वंशाकडे घेऊन जाणार, हे बाबासाहेबांनी हरले होते. धर्माच्या बाबतीत खुळसट कल्पना त्यांच्या डोक्यात कधीच नव्हती. ते कम्युनिझमच्या विरोधात उभे होते. मन शुद्ध करून सदगुणांकडे वळले पाहिजे, असे त्यांचे मत होते. परंतु, अतिवाद्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याकाळी अतिवादी हिंदुत्व मोठी समस्या बनल्याचे सांगत ती आजही काही प्रमाणात अस्तित्वात असल्याचेही प्रा. रायण्णवर यांनी नमूद केले.
आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान
केवळ राजकीय लोकशाही ही आधुनिक भारतासाठी पुरेशी नसून सामाजिक व सांस्कृतिक लोकशाही प्रस्थापित करणे, हे आपले उद्दिष्ट आहे. हे आपण साध्य केले नाही, तर देशात अराजकता निर्माण होईल, अशी चेतावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. सामाजिक कार्याबरोबरच रस्ते, धरणांची उभारणी, शेतकरी कल्याणाचे विविध प्रकल्प, आर्थिक संस्थांची उभारणी अशा विविध मार्गांनी बाबासाहेबांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे, असेही प्रा. रायण्णवर यांनी सांगितले.
