शाळेसाठी 38 लाख मंजुरी व विकासकाम पूर्ण – निवास थोरात
कराड/प्रतिनिधी : –
माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील जि. प. शाळेच्या खोल्या, शाळेचे सुशोभीकरण व संरक्षण भिंत यासाठी एकत्रित 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला होता. त्यानंतर नुकतेच शाळेचे काम पूर्ण झाले असून त्याचे उदघाट्न शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते व निवासराव थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मुख्याध्यापक लिंबारे सर, घोगरे मॅडम, लिंबारे मॅडम, महावीर पवार, सचिन पवार, विजय पवार, संदीप पाटील, निलेश पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकार्पण : वडोली निळेश्वर येथील शाळेतील खोल्यांचे व संरक्षण भिंतीचे लोकार्पण अत्यंत उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी शिक्षक, ग्रामस्थ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
काय शिकलो याला महत्व : शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत निवासराव थोरात म्हणाले, कोणत्या शाळेत शिकलो; यापेक्षा शाळेत काय शिकलो, हे महत्वाचे असते, असे सांगत श्री. थोरात म्हणाले, शासनाने जि. प. शाळेची अनेक वर्षांपूर्वी सुरुवात केल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेता आले.
…तर विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल : माझे सुद्धा प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले असल्याचे सांगत श्री. थोरात म्हणाले, त्यामुळे शासनाच्या शाळेतील शिक्षक शासकीय सेवेतच असतात आणि त्या प्रेरणेने ते विद्यार्थ्यांना आत्मियेतेने शिकवतात. आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा सुस्थितीत व आधुनिक तंत्र सहित स्मार्ट शाळा असतील, तर जि. प. शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांचा ओघ वाढत जाईल. यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीचे प्रयत्न अत्यंत महत्वाचे असतात.
