कराड/प्रतिनिधी : –
कै. स्वातत्र्य सैनिक, माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मलकापूर नगरपालिकेच्या चोवीस तास नळपाणी पुरवठा योजनेस टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबईचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी शहरी भागात सतत पाणीपुरवठा करणारी आदर्शवत संस्था या अनुषंगाने अभ्यास भेट दिली.
१६ वर्षे योजना सातत्यपुर्ण सुरु : मलकापूर पालिकेच्या चोवीस तास नळपाणी पुरवठा योजनेस देशातील विविध राज्याचे पदाधिकारी व अधिकारी भेट देत असतात. सन २००९ पासून गेली १६ वर्षे ही योजना सातत्यपुर्ण सुरु असल्याने तज्ञांमध्ये या योजनेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
योजनेस भेट व पाहणी : या योजनेची माहिती घेण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबईचे प्राध्यापक, तसेच विद्यार्थ्यांनी मलकापूर पालिकेस दि. १० व ११ एप्रिल २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.
जलनिती व प्रशासन व्यवस्थेची घेतली माहिती : टीआयएसएस (TISS) ही सामाजिक कार्य, व्यवस्थापन, विकास अभ्यास आणि इतर आंतरविद्याशाखीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणारी प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था मास्टर्स इन वॉटर पॉलिसी ॲण्ड गव्हर्नन्स या नावाने पदव्युत्तर पदवी कार्यक्रम आयोजित करते. त्याअनुषंगाने मलकापूरच्या चोवीस तास नळपाणी पुरवठा योजना व्यवस्थेतील विविध घटकांना जलनिती आणि प्रशासन या विषयांतील मास्टर्सच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.
चर्चासत्र : या भेटीदरम्यान सदर योजना अखंडितपणे कार्यान्वित असण्यापाठीमागचे तांत्रिक, राजकीय व सामाजिक माहिती जाणून घेण्यासाठी नगरपालिका बहुउद्देशीय इमारत, लक्ष्मीनगर याठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
उपस्थित मान्यवर : टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबईचे प्रा. डॉ. प्रांजल दिक्षित, श्रीमती स्मिता वायंगणकर, को-ऑर्डिनेटर, विविध राज्यातून 30 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी, तसेच मलकापूरचे पाणी पुरवठा व जलनिस्सारण अभियंता प्रसाद पाटील, स्वच्छ भारत अभियानाचे शहर समन्वयक पुंडलिक ढगे व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व जगन्नाथ मुढे उपस्थित होते.
योजनेच्या प्रवासाचा आढावा : चर्चासत्रात मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य व जलनिस्सारण समितीचे सभापती मनोहर शिंदे यांनी मलकापूर ग्रामपंचायत ते नगरपंचायत, तसेच नगरपालिका होईपर्यंतच्या सर्व प्रवासाचा आढावा घेतला.
मार्गदर्शन : योजनेची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत व नगरपालिकेचे नगरसेवक, महिला सदस्यांचे सहकार्य याचा आवर्जुन उल्लेख करत मनोहर शिंदे यांनी योजनेचे सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
आभार : याप्रसंगी प्रा. डॉ. प्रांजल दिक्षित यांनी मलकापूरच्या आदर्शवत चोवीस तास नळपाणी पुरवठा योजनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्धल आभार व्यक्त केले.
