कराड/प्रतिनिधी : –
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) गावचे सुपुत्र, प्रतिथयश विधिज्ञ अॅड. भारत मोहिते यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत कराड येथील मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचा महात्मा फुले राज्यस्तरीय समाजसेवा प्रेरणा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय तडाके यांच्याकडून अॅड. मोहिते यांना याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.
पुरस्कार वितरण : या पुरस्काराचे वितरण महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून दि. २५ एप्रिल रोजी कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अॅड. भारत मोहिते यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रेरणादायी वक्ते : अॅड. मोहिते हे प्रतिथयश विधिज्ञ असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून विविध उपक्रमही राबवतात. तसेच ते एक प्रेरणादायी वक्तेही असून विविध सामाजिक विषयांवर ते राज्यभर व्याख्याने देतात. त्यांना जाहीर झालेल्या या प्रेरणा पुरस्काराबद्धल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
