चैत्राम पवार; ग्रामीण उद्योगधंदे, शेती आणि शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरता
कराड/प्रतिनिधी : –
गावाचा विकास गावातल्या माणसांनीच करायचा असतो; जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या नैसर्गिक पंचसूत्रातूनच खरा ग्रामविकास होवू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदिवासी बांधवांचे मार्गदर्शक श्री. चैत्राम पवार यांनी केले.
मार्गदर्शन : जनजाती कल्याण आश्रम, कराड शाखेच्यावतीने आण्णा भोई स्मृतिसदन (पंताचा कोट), कराड येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कराड शाखेच्या अध्यक्षा डॉ. अंजनीताई शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिकाऊ विकास शक्य : गाव सोडून शहरांकडे धाव घेण्यात काही अर्थ नाही. आपल्या गावातील साधनसंपत्ती, निसर्गाची देणगी आणि सामूहिक श्रम यांच्या बळावरच टिकाऊ विकास शक्य आहे. हे पटवून दिल्याने समाजाचा विचार बदलला आणि त्यातून ‘बारीपाडा’सारख्या आदिवासी गावाचा शाश्वत विकास झाला, स्वाभिमानी व स्वावलंबी समाज बनला. पाण्याची योग्य साठवणूक, जंगलांची काळजी, जमिनीची सुपीकता, लोकांचा सहभाग आणि जनावरांचे संवर्धन या पंचसूत्रांचा अंगीकार केल्याने बारीपाडा आज आदर्श गाव ठरले असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
बारीपाड्याला ‘नंदनवन’ बनविले : गावात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना पाणी टंचाई दूर करण्यासाठी शेकडो बांधबंधारे उभारणे आणि समतल चर काढणे, जंगल संवर्धनासाठी ग्रामस्थांचा सहभाग, गो-पालन व सेंद्रिय शेतीचा पुरस्कार, तसेच स्थानिक पीकपद्धती आणि त्यातून अर्थप्राप्ती, वृक्ष संवर्धन व कुऱ्हाड बंदी, चुकार शिक्षक व मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड, सोलर कुकर उपलब्धी, बचत गटाची स्थापना, १८०० हेक्टरमध्ये झाडे लावून जंगल निर्मिती, अभ्याससहली, ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही निर्णयप्रक्रिया आणि जनावरांच्या आरोग्य व संवर्धनाकडे विशेष लक्ष आदी अनेक उपक्रमांनी बारीपाड्याला ‘नंदनवन’ बनविले असल्याचे त्यांनी सांगितले. आज हे कार्य बारीपाड्यासह लगतच्या ४४ गावांत सुरु असून, यांतून तब्बल १२०० हेक्टर क्षेत्र विकसित केले आहे. या सगळ्यात जनजाती कल्याण आश्रमाची प्रेरणा व मोलाची साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भरता हीच खरी ताकद : तरुण पिढीला उद्देशून पवार म्हणाले, आज गावोगावची तरुणाई शिक्षणानंतर शहरांकडे वळते. मात्र गावातच उद्योगधंदे, शेती आणि शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होणे, हीच खरी ताकद आहे. गावाचे भविष्य घडवायचे असेल तर, गाव न सोडता, गावातच राहून ते समृद्ध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

निसर्ग तपश्चर्येची साक्ष : प्रास्ताविकात डॉ. अंजनीताई शाह यांनी मागासलेल्या आदिवासी पाड्याला एक आदर्श गाव पाडा बनवून जगाच्या नकाशावर आणण्याची किमया चैत्राम पवार यांनी साधल्याचे सांगितले. याठिकाणी एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली नाही, लोकसहभागातून त्यांनी साधलेला हा शाश्वत विकास त्यांच्या निसर्ग तपश्चर्येची साक्ष देतो. बारीपाडा हे गाव आज स्वयंपूर्ण असून, ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल बनले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असून, त्यांचा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
प्रश्नांची समर्पक उत्तरे : दरम्यान, श्रोत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. सौ. प्रतिभा ताम्हनकर यांनी मनोगत व्यक्त केले. कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांचन विणकर यांनी, परिचय श्री. बोकील यांनी करून दिला, तर प्रकाश शेंबडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख रविंद्र गुरसाळे, सचिव सौ. रेखा फणसळकर, श्री. पाणदरे यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आश्रमाच्या सदस्यांसह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मोहाच्या झाडाच्या संवर्धनातून विकास
येथील जंगलात असलेल्या मोहाच्या झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या फुलांपासून मनुके, चॉकलेट, साबण, व्हॅसलीन आणि उत्तम दर्जाची वाईन तयार केली. यातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळाला. मोहाच्या तब्बल ४३२ प्रजाती असून, ८० लाखांपेक्षा जास्त झाडांचे संरक्षण व संवर्धन केले. या ठिकाणी लवकरच निसर्ग विज्ञान केंद्र सुरू होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
रानभाजी महोत्सव
पाड्यातील ज्येष्ठ महिलांकडे असलेले पारंपारिक वनौषधींचे ज्ञान संकलित करण्यासाठी रानभाजी महोत्सव सुरू केला. या माध्यमातून तब्बल १५५ पेक्षा जास्त रानभाज्यांचा शोध लागला. या महोत्सवात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांनाही स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो. हा महोत्सव या परिसराची ओळख बनला आहे.












