दिग्विजय पाटील यांच्या कॅमेऱ्यात कैद; वन विभाग सतर्क, अभ्यासासाठी कॅमेरा ट्रॅप
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलात एका अत्यंत दुर्मिळ अशा काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद झाली असून, या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे जंगल सफरीसाठी गेले असता त्यांना पूर्णतः काळ्या रंगाचा रानकुत्रा दिसून आला. त्यांनी तो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून लगेचच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना याबाबत माहिती दिली.
८८ वर्षांनी अशा दुर्मिळ प्राण्याचे दर्शन : ही नोंद दुर्मिळ समजली जात असून, वन विभागाच्या अभिलेखानुसार यापूर्वी १९३६ मध्ये तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथे स्कॉट्समॅन आणि निसर्गशास्त्रज्ञ आर. सी. मॉरिस यांनी अशाच प्रकारच्या काळ्या रानकुत्र्याची नोंद केली होती. जवळपास ८८ वर्षांनी अशा दुर्मिळ प्राण्याचे दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले आहे.
कोळशिंदा : रानकुत्रा किंवा कोळशिंदा (शास्त्रीय नाव : Cuon alpinus) सामान्यतः तांबूस लालसर रंगाचा असतो. मात्र, मेलेनिस्टिक या जैविक स्थितीमुळे त्याच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्य प्रमाण निर्माण होते, ज्यामुळे तो पूर्णतः काळा दिसतो. ही स्थिती सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यात आढळते आणि ती अनुवांशिक स्वरूपाची असते.

वैशिष्ट्ये : या जातीच्या रानकुत्र्याची उंची ४३ ते ४५ सें.मी., शरीराची लांबी सुमारे ३ फूट, नराचे वजन सुमारे २० किलो, मादीचे थोडे कमी, कळपात राहून सामूहिक शिकार करणारा शिकारी प्राणी, मुख्यतः हरीणवर्गीय प्राण्यांची शिकार करणारा अशी वैशिष्ट्ये आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पिल्लांचा जन्म; मादी एका वेळी ४ ते ६ पिल्लांना जन्म देते.
कॅमेरा ट्रॅप लावण्याचे आदेश : दिग्विजय पाटील यांनी टिपलेल्या छायाचित्रामुळे वन विभाग सतर्क झाला असून, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी संबंधित भागात कॅमेरा ट्रॅप लावण्याचे आदेश वनरक्षकांना दिले आहेत. यामुळे या दुर्मिळ रानकुत्र्याच्या हालचालींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
“मेलेनिस्टिक म्हणजे शरीरात मेलेनिनचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी काळसर दिसतो. यापूर्वी सह्याद्रीत काळा बिबट्याही नोंदवला गेला होता. आता काळा रानकुत्राही आढळल्याने या प्रकल्पातील जैवविविधतेचे आणखी एक दुर्मिळ रूप समोर आले आहे,”
– रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)
