जयकुमार गोरे; सैदापूरला भेट देत ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची केली पाहणी
कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यातील सैदापूर गाव राज्यातील आदर्श ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून उभे राहावे, यासाठी ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सत्कार : कराड दौऱ्यावर असताना सैदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत करण्यात आले. सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी सदस्य भीमराव पाटील, बनवडीचे सरपंच प्रदीप पाटील, पांडुरंग कोठावळे, रणवीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
विकासकामांची पाहणी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान, सातारा तसेच जिल्हा परिषद सातारा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित ‘मिनी सरस जत्रा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मंत्री गोरे सैकराड येथे आले होते. या निमित्ताने त्यांनी सैदापूरला भेट देत ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मूलभूत सुविधांची घेतली माहिती : सैदापूरमध्ये राबविण्यात येत असलेली २४x७ पाणीपुरवठा योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे जाळे, तसेच इतर मूलभूत सुविधांची माहिती त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून घेतली. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक बाबींवरही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
आश्वासन : गावाच्या विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातून सैदापूर राज्यातील आदर्श गाव ठरू शकते, असे मत व्यक्त करत मंत्री गोरे यांनी आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सैदापूरला विकासाचे रोल मॉडेल बनवून ‘विद्यानगरी सैदापूर’ची ओळख राज्यभर दृढ करू.
– फत्तेसिंह जाधव (सरपंच, सैदापूर)











