उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी उर्वरित निधीची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विधानसभेत आ. डॉ. अतुल भोसले यांचा औचित्याचा मुद्दा

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असताना उर्वरित २० टक्के निधी तातडीने मंजूर करावा, अशी ठाम मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज राज्य विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान औचित्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी शासनाचे लक्ष या प्रलंबित निधीकडे वेधले.

हजारो नागरिकांना दिलासा : डॉ. भोसले यांनी सभागृहात, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून मोठा निधी खर्च झाला असल्याचे स्पष्ट केले. केवळ २० टक्के निधीअभावी योजना रखडली आहे. उर्वरित रक्कम तातडीने उपलब्ध करून दिल्यास ही योजना अल्पावधीत कार्यान्वित होऊन हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

…त्या गावांना प्राधान्य गरजेचे : योजनेअंतर्गत सुरुवातीला १७ गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यातील काही गावांनी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्याने त्यांची या प्रादेशिक योजनेवरील गरज कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार आराखड्यात आवश्यक बदल करून प्रत्यक्ष पाणीटंचाई भोगणाऱ्या गावांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाश्वत पाणीपुरवठा शक्य : ही योजना पूर्ण झाल्यास कराड दक्षिणमधील कोयना वसाहत, नांदलापूर, तसेच मलकापूर शहराच्या विस्तारित भागाला शाश्वत पाणीपुरवठा शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने आतापर्यंत खर्च केलेला निधी वाया जाऊ नये आणि टंचाईग्रस्त भागांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी योजनेच्या पुनर्रचनेचा निर्णय त्वरित घेऊन उर्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!