पक्षश्रेष्ठींकडून कार्याची दखल; प्रदेशाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती, पक्षीय राजकारणात दबदबा

राजेंद्र मोहिते/कराड : –
कराड उत्तरच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अंतर्गत तणाव, सहानुभूतीची लाट आणि संघटनात्मक चढाओढ यांना अखेर स्पष्ट दिशा मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाने किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ यांची पुनर्नियुक्ती करत त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे. या निर्णयामुळे कराड उत्तरमधील भावी राजकीय दावेदारीवर रामकृष्ण वेताळ यांच्या नावाचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रभाव आणि संघटनशक्ती पुन्हा अधोरेखित : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेताळ कुटुंबाभोवती निर्माण झालेली सहानुभूती, पक्षांतर्गत मतभेद आणि त्यानंतरची निलंबन कारवाई या घटनांनी स्थानिक राजकारण ढवळून निघाले होते. मात्र या सर्व घडामोडींमध्ये त्यांच्या पत्नी सौ. विद्या वेताळ यांनी अपक्ष म्हणून मिळवलेला विजय हा निर्णायक टप्पा ठरला. या निकालाने रामकृष्ण वेताळ यांचा स्थानिक प्रभाव आणि संघटनशक्ती पुन्हा अधोरेखित झाल्याचे राजकीय जाणकार मानतात.
‘ग्राउंड कनेक्टिव्हिटी’ सिद्ध : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत श्री. वेताळ यांनी बूथस्तरावर संघटन उभारणी, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणुकीतील अपक्ष विजयाने त्यांच्या नेतृत्वाची ‘ग्राउंड कनेक्टिव्हिटी’ सिद्ध झाल्याचे विश्लेषण पुढे येत आहे. परिणामी, पक्षश्रेष्ठींनी संघटनात्मक स्थैर्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे पुन्हा मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

विधानसभा समीकरणांमध्ये नाव ठळक : प्रदेशाध्यक्षपदामुळे वेताळ यांचे राज्यस्तरीय राजकारणातील स्थान अधिक बळकट झाले आहे. पक्षातील राज्य व जिल्हा स्तरावरील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त झालेल्या शुभेच्छांमुळे त्यांची पक्षातील स्वीकारार्हता वाढल्याचे स्पष्ट होत आहे. या पाठिंब्यामुळे भविष्यातील विधानसभा समीकरणांमध्ये त्यांचे नाव अधिक ठळक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचा राजकीय संदेश : राजकीय घडामोडींच्या या मालिकेमुळे कराड उत्तरमध्ये नेतृत्वाच्या स्पर्धेला वेग आला आहे. वेताळ यांची पुनर्स्थापना ही केवळ संघटनात्मक नियुक्ती नसून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा राजकीय संदेश असल्याचे मानले जात आहे.
पुढील राजकीय पावलांकडे लक्ष : एकूणच, अंतर्गत संघर्षातून बाहेर पडत संघटनात्मक विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून रामकृष्ण वेताळ यांचे नाव सध्या कराड उत्तरच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी काळात त्यांच्या पुढील राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नव्या राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वेताळ समर्थकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकांमध्ये संघटनात्मक बळ वाढवून विधानसभा निवडणुकीसाठी भक्कम पायाभरणी करण्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कराड उत्तरमध्ये वेताळ यांच्या नेतृत्वाभोवती नव्या राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते.












