लेकीच्या गृहप्रवेशाला दातृत्वाची सुवर्णकिनार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पवार कुटुंबीयांचा समाजापुढे आदर्श; ८५ महिलांना संसारोपयोगी भेटवस्तू, गतिमंद मुलांच्या शाळेलाही मदत

कराड/प्रतिनिधी : –

‘कन्या म्हणजे घरची लक्ष्मी’, ही केवळ म्हण न ठरता ती आचरणात उतरविण्याचा सुंदर आदर्श विंग (ता. कराड) येथील पवार कुटुंबीयांनी समाजासमोर घालून दिला आहे. लाडक्या लेकीच्या आगमनाचा आनंद साजरा करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत त्यांनी दातृत्वाचा हात पुढे केला आणि मुलीला मुलांइतकेच स्थान देण्याचा सकारात्मक संदेश त्यांनी समाजाला दिला.

सामाजिक जाणीवेचा उत्सव : विंग येथील सेवानिवृत्त कला शिक्षक, प्रख्यात चित्रकार व कवी बाबा पवार यांच्या कुटुंबात नुकतेच कन्यारत्नाचे आगमन झाले. त्यांचे चि. प्रतिक आणि सौ. काजल यांच्या घरी जन्मलेल्या चिमुकल्या ‘दुर्वा’च्या स्वागतरुपी गृहप्रवेशानिमित्त आयोजित हळदीकुंकू समारंभ हा केवळ कौटुंबिक आनंदसोहळा न राहता सामाजिक जाणीवेचा उत्सव ठरला. निरोगी,

उज्ज्वल आयुष्याच्या शुभेच्छा : समारंभासाठी उपस्थित असलेल्या ८५ महिलांना संसारोपयोगी वस्तू भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘मुलगी जन्माला येणे हा अभिमानाचा क्षण आहे,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महिलांनीही दुर्वाला निरोगी, सुदृढ आणि उज्ज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

गतिमंद मुलांच्या शाळेला मदत : याचवेळी समाजातील विशेष गरज असलेल्या मुलांप्रती संवेदनशीलता दाखवत पवार कुटुंबीयांनी विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या ठाणे येथील गतिमंद मुलांच्या शाळेला १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दुर्वाला शुभाशीर्वाद दिले.

समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण : आजच्या काळात मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित होत असताना पवार कुटुंबीयांनी आनंदसोहळ्याला सामाजिक स्पर्श देत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

समाजभान व दातृत्वाचे कौतुक : कौटुंबिक आनंद आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालत त्यांनी ‘लेकीचे स्वागत म्हणजे समाजाच्या भविष्यातील उज्ज्वल आशेचे स्वागत’ हा संदेश आपल्या कृतीतून अधोरेखित केला. त्यांच्या या समाजभान आणि दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!