येवती-म्हासोली प्रकल्पासाठी बंदिस्त पाईपलाईनला तातडीची मान्यता द्या 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत मागणी

कराड/प्रतिनिधी : – 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सिंचन व पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी ठाम भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राज्य विधानसभेत मांडली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी येवती-म्हासोली मध्यम पाटबंधारे प्रकल्पासह खोडशी बंधारा, ‘नेकलेस रोड’, स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ विकास, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि मलकापूर नगरपालिकेच्या इमारतीचा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित केला.

वीज व देखभाल खर्चात बचत : येवती-म्हासोली मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. खुल्या कालव्यांमुळे होणारी गळती आणि वितरणातील अडचणी लक्षात घेता, बंदिस्त पाईपलाईन योजना राबविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे पाण्याची नासाडी थांबेल, शेवटच्या शेतापर्यंत समान दाबाने पाणी मिळेल, तसेच वीज व देखभाल खर्चात बचत होईल, असे त्यांनी सांगितले. या कामासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

१५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली : कराड तालुक्यातील ऐतिहासिक खोडशी बंधाऱ्याच्या पायथ्याशी १९८५ साली प्रस्तावित रिटेन्ड बंधाऱ्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित २० टक्के काम निधीअभावी रखडले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. कालव्यांमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती वंचित राहत असल्याने हा प्रकल्प तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कराडसाठी ‘नेकलेस रोड’ आणि प्रीतिसंगम विकास

पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. कृष्णा–कोयना प्रीतिसंगम परिसराचा सर्वांगीण विकास, पूरसंरक्षण भिंत आणि रिव्हरफ्रंट प्रकल्पांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या विकासकामांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच पर्यटन आणि स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सूर्यघर योजनेत १० हजार घरांचे लक्ष्य

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत कराड दक्षिणमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत १,००० घरांवर सोलर पॅनल बसविण्यात आले असून, शासनाच्या अनुदानामुळे नागरिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. स्थानिक स्तरावर पुढाकार घेऊन ३ किलोवॅट संचाची किंमत कमी करण्यात यश आले असून, अनेक घरांचे वीजबिल शून्यावर आले आहे. येत्या वर्षभरात १० हजार घरांना या योजनेचा लाभ देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मलकापूर नगरपालिकेची इमारत पूर्ण करा

मलकापूर येथील अपूर्ण प्रशासकीय इमारतीचा प्रश्नही त्यांनी सभागृहात मांडला. किरकोळ काम शिल्लक असताना केवळ निधीअभावी प्रकल्प रखडणे खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. इमारत पूर्ण झाल्यास विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत राहून प्रशासन अधिक कार्यक्षम होईल. तसेच परिसरात ज्येष्ठांसाठी बसण्याची सोय, वॉकिंग ट्रॅक आणि हरित पट्टा विकसित करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!