सुमारे अडीच हजार नागरिकांचा ‘रस्ता सुरक्षा दौड 2026’मध्ये उत्स्फूर्त सहभाग; शहरात उत्साह, ऊर्जा व सामाजिक बांधिलकीचे वातावरण
कराड/प्रतिनिधी : –
वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाहनचालना आणि उत्तम आरोग्याचा संदेश देत कराडकरांनी एकत्र येत जबाबदार नागरिकत्वाचे दर्शन घडवले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा दौड 2026’ या जनजागृती उपक्रमाला तब्बल अडीच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शुभारंभ : ‘जीवनरक्षा… रस्ता सुरक्षा’ या प्रभावी घोषवाक्याखाली शनिवारी (दि. २८) सकाळी ७ वाजता ऐतिहासिक कृष्णा घाट येथून या दौडीचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत दौडची सुरुवात झाली आणि कराड शहरात उत्साह, ऊर्जा व सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने यंदा अधिक व्यापक स्वरूप धारण केले.
मुख्य संदेश : दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन ‘दुचाकीस्वार व पादचारी वाचवा’ हा मुख्य संदेश या दौडीद्वारे देण्यात आला. कराड व पाटण तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेत सामाजिक जाणीव जागवली.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी दौडला माजी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक प्रविण पवार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंम्पे, पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सुर्यवंशी, उद्योजक रणजीत पाटील, सचिन पवार, नवनाथ पालेकर, दत्तात्रय देसाई, सतीश वेताळ, गणेश भिसे, अमर शिंदे, भूषण शहा, कुमार ओसवाल, काका देशमुख, दादाराजे देसाई, जीवन सावंत, भरत पवार, शंकर खबाले, रितेश शहा, श्री सचदेव, अॅड. जनार्दन बोत्रे, दिलीप पाटणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय माधवान, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुदर्शन देवढे, स्वप्निल कदम, सागर विश्वासराव, सुरेश आगवणे, धनंजय हिले, समीर सावंत, शिऱीष पोकळे, संदीप कुंभार, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भारत गोरड, शिवनी सर्ग्रे, शितल घाडगे, रजनी पाटोळे, अनुजा मोहिते, मयुरी रजपूत, श्रद्धा माने, सुरभी घार्गे, जय मोटर्स व कणसे हुंडाईचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन : या उपक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांच्या समन्वयातून करण्यात आल्याचे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी सांगितले.
सुसंस्कृत वाहनचालना संस्कृती विकसित होईल : प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती जीवनरक्षणाची चळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटेल आणि सुसंस्कृत वाहनचालना संस्कृती विकसित होईल, असा आशावाद मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी, व्यक्त केला.
… तेव्हाच दौड यशस्वी होईल : या उपक्रमाद्वारे केलेली दृढ प्रतिज्ञा प्रत्येकाने आयुष्यभर पाळावी. वाहनाच्या संदर्भात आपल्या वागणुकीत अनुकूल बदल होतील, तेव्हाच ही दौड सर्वार्थाने यशस्वी होईल, असे श्री. कणसे यांनी सांगितले.
आभार व ऋणनिर्देश : या दौडसाठी कराड प्रशासन, नगरपालिका, पोलीस व वाहतूक पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल, तसेच दौड यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानून त्यांच्याप्रती चैतन्य कणसे यांनी ऋण व्यक्त केले.












