मालमत्ता करावरील शास्ती माफ करा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजपकडून मलकापूर नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र शासनाने 19 मे 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मलकापूर शहरातील नागरिकांना मिळावा, अशी मागणी कराड दक्षिण भारतीय जनता पक्षाच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन : भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी भाजप कराड दक्षिण मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, तानाजी देशमुख, भारत जंञे, सुरज शेवाळे, नगरसेवक शहाजी पाटील, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, प्रशांत चांदे, कान्हा लाखे, प्रशांत गावडे, सूर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, नंदकुमार बागल, विजेंद्र जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक मिळकतधारक कर भरण्यात असमर्थ : महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी  अधिनियम 1965 च्या कलम 150(अ)(1) नुसार थकित मालमत्ता करावर दरमहा 2 टक्के शास्ती आकारली जाते. आर्थिक अडचणीमुळे अनेक मिळकतधारक कर भरण्यात असमर्थ असल्याने थकबाकीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे करवसुलीवर प्रतिकूल परिणाम होतो.

‘अभय योजना’ : यावर उपाययोजना म्हणून शासनाने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, त्यानुसार 19 मे 2025 पर्यंत थकित असलेल्या मिळकतधारकांची शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि नागरिकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी मलकापूर पालिकेमार्फत शहरात व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मिळकतधारकांनी थकबाकी भरावी : पालिका कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतधारकांनी ही संधी साधून आपली थकबाकी भरावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!