कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा ५२ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आदर्श चैतन्य विद्यालय आणि आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिमा पूजन : कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक ब्रह्मलीन गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
दर्जेदार शिक्षणासाठी स्थापना : याप्रसंगी बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, “दि. १८ जून १९७३ रोजी गंगाधर चैतन्य महाराज यांनी संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था आज विविध शाखांमधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. सध्या संस्थेंतर्गत दोन उच्च माध्यमिक विद्यालये, पाच माध्यमिक शाळा, दोन प्राथमिक शाळा व एक इंग्लिश मीडियम स्कूल कार्यरत आहेत.”
शिक्षणासोबतच सुसंस्कारांची रुजवणूक : संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सुसंस्कारही दिले जातात. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असून, संस्था शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेत असल्याचेही श्री. थोरात यांनी यावेळी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास प्राचार्या सौ. ए. एस. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक भरत बुरुंगले, विभाग प्रमुख सौ. एस. डी. पाटील, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनदर्शिका वितरित : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. डी. खंडागळे व शरद तांबवेकर यांनी केले, तर भरत बुरुंगले यांनी आभार मानले. वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संस्थेची दिनदर्शिका वितरित करण्यात आली.