डॉ. इंद्रजित मोहिते : दक्षिणच्या उर्वरित विकासासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण हाच योग्य चेहरा
कराड/प्रतिनिधी : –
देशात महिलांवर अत्याचार वाढले असून अशा लोकांना भाजप पाठीशी घालत आहे. यशवंतराव मोहिते आणि त्या काळातील धुरिणांनी हे राज्य बंधुता, समता आणि समानतेच्या बळावर चालवले. परंतु, आताच्या स्थितीत केवळ वर्णभेद व जाती जातीत तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेणारी प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एका विशिष्ट परिस्थितीत अडकला आहे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार घेवून पुढे चालणाऱ्या पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोकांना पाठिंबा द्या, असे आवाहन कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केले.
मोहिते गटाचा कार्यकर्ता मेळावा :वडगाव हवेली, ता. कराड येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्जेराव थोरात होते.
मान्यवरांची उपस्थिती : या मेळाव्यास उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, रोहित पाटील, संभाजी काकडे, शिवराज मोहिते, जे. डी. मोरे, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, मिनाक्षी जगताप, शिवाजीराव जाधव, संताजी थोरात, वैभव थोरात, संजय तडाखे, डॉ. सुधीर जगताप, माजी उपसरपंच जयवंतराव जगताप, संतोष जगताप, जे. जे. जगताप, संजय जगताप, पतंगराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराजबाबांपेक्षा दुसरा श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही :विधानसभेत जाणारा माणूस हा कोणाचाही हस्तक नसावा, असे सांगत डॉ. मोहिते म्हणाले, तो आपल्या मतदारसंघाचे विचार मांडण्याची क्षमता, वक्तृत्व व अभ्यासू असावा. यासाठी पृथ्वीराजबाबांपेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही. कराड दक्षिणेचा खऱ्या अर्थाने उर्वरित विकास साधण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा आहेत. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यशवंतराव मोहिते यांनी मतदारसंघाची वैचारिक नांगरट केली :
यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाची वैचारिक नांगरट केल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव पाटील – उंडाळकर यांनी वाडी – वस्तीवर विकास पोहचवला. यातून कराडचा परिसर बदलला. मी मुख्यमंत्री असताना कराड व मतदारसंघात पायाभूत सुविधा उभ्या केल्या. यापुढील काळात राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
भाऊ आणि काकांचे विचार पुढे नेवूया : ही निवडणूक विचारधारेची असल्याचे संगत श्री. चव्हाण म्हणाले, यशवंतराव मोहिते आणि विलासकाकांनी जो विचार जपला, तो पुढे नेवूया. जातीयवादी विचारांना थारा न देण्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होईल.
मनोगत : डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रताप जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. जे. जे. जगताप यांनी आभार मानले.
कृष्णेचे दिवाळीचे बील कुठे आहे?
साखर कारखाने ऊस दरात 3100 रुपयांवर का गारठले आहेत. कृष्णेचे दिवाळीचे बील कुठे आहे? आम्ही नंदनवन केले. भगीरथ आहात, म्हणता मग इरिगेशन योजना बंद का आहेत. योजनांसाठी शेतकऱ्यांच्या अंगावर असलेले कर्ज उतरले का? याचा विचार होवून तात्विक निवडणूकीत प्रत्येकाने विरोधकांच्या दारात जावून मते मागावीत. गटतट विसरून कामाला लागा, असे आवाहनही डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केले.