माजी सहकारमंत्र्यांनी डावलल्याने वंचितची उमेदवारी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अन्सार पटेल; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद दाखवू

कराड/प्रतिनिधी : –

गत पंचवीस वर्षे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये उमेदीने काम केले. परंतु, त्यांच्याकडून सातत्याने विविध गोष्टींमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगूनही ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली नाही. त्यामुळे आपण वेगळी वाट धरून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घेत लढा दिला असल्याचे अन्सार पटेल यांनी सांगितले.

पत्रकार परिषद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मान्यवर : यावेळी सामाजिक कार्यकर्ते आसिद पटेल, तालुकाध्यक्ष सुरेश बैले व तालुका महासचिव अधिकराव सोनवले उपस्थित होते.

उत्तरेत अनेक चुकीच्या गोष्टी : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघात अनेक चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचे सांगत श्री. पटेल म्हणाले, गेल्या 25 वर्षांत किंबहुना त्याआधीपासून कराड उत्तर मतदारसंघातील अनेक स्थानिक समस्या जैसे थे’च आहेत. याठिकाणी बेरोजगारीचाही मोठा प्रश्न असून स्थानिक लोकप्रतिनिधींना तो अद्याप सोडवता न आल्याने येथील लोकांची अत्यंत वाईट परिस्थिती असल्याची टीकाही त्यांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता केली.

…त्या केवळ गप्पाच : 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या केवळ गप्पा असून प्रत्यक्षात त्याच्या उलट परिस्थिती आहे. यासाठी आगामी पाच वर्षांत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

…त्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही : नुकतीच सातारा येथे पक्षाच्या महासचिवांची बैठक पार पडली. त्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली असल्याचे सांगताना ते म्हणाले, पक्षाचे वरिष्ठ नेते ज्या सूचना देतील, त्यानुसार आम्ही वाटचाल करणार आहोत. विधानसभा निवडणुकीत अल्प कालावधी मिळाल्यामुळे, तसेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी ऐन निवडणुकीत पदाचा राजीनामा दिल्याने आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही.

उत्तरेत वंचितचा आमदार निवडून आणणार : या मतदारसंघात वंचितची जवळपास 35 ते 40 हजार मते असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवू, असा विश्वास व्यक्त करत श्री. पटेल म्हणाले, पुढील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वंचितचा आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

निवडणूक प्रमुख पदासाठी आग्रही

पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सध्या रिक्त असून लवकरच नवी कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदासाठी आग्रही राहणार असल्याचे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केले. तसेच यापुढे आपण आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

मनोजदादा मोठे भाऊ

मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे हे आमचे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा, अशी आमची मागणी त्यांच्याकडे राहणार आहे. ते नक्कीच सर्व जनतेला न्याय देतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मात्र, चुकीच्या गोष्टींवर वेळोवेळी आवाज उठवणार असून प्रसंगी तीव्र आंदोलनही छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मतदारसंघातील लोकांची सेवा करणार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले असले, तरीही खचून न जाता आपण सर्वसामान्य लोकांसाठी कार्यरत राहणार आहोत. तसेच लवकरच आपण चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करणार असून यामाध्यमातून मतदारसंघातील जनतेची सेवा करणार असल्याचेही श्री. पटेल यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!