रक्तदाता घडवावा लागतो

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतीमित्र अशोकराव थोरात; श्री मळाईग्रुपच्या रक्तदान शिबिरात 366 रक्तदात्यांचे योगदान 

कराड/प्रतिनिधी : – 

रक्तदान हे सर्वात पवित्र दान आहे. एखाद्याला रक्तदान करणे यासारखे पुण्य नसून आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, त्याला एकप्रकारे पुनर्जन्म मिळू शकतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवली पाहिजे. याच भावनेतूनच श्री मळाई ग्रुपतर्फे राबवण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरास सलग सतरा 17 व्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रक्तदाता हा घडवावा लागतो, हे या उपक्रमाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून स्पष्ट होत असल्याचे मत शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबिर : मलकापूर (ता. कराड) येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात सलग 17 व्या वर्षी श्री मळाई ग्रुपच्या भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

366 रक्तदात्यांचे रक्तदान : या शिबिरात सर्वोच्चांकी 366 रक्तदात्यांनी बहुमूल्य योगदान देत रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले.

मलकापूर : या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना हृदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील, समवेत शेतीमित्र अशोकराव थोरात, डॉ. स्वाती थोरात, अजित थोरात व मान्यवर.

उद्घाटन : या शिबिराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांच्या हस्ते व शेतीमित्र अशोकराव थोरात, डॉ. स्वाती थोरात, मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, चंद्रकांत टंंकसाळे, एम. एस. जाधव, डॉ. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

हायजेनिक रक्तदान शिबिर : रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, मळाई ग्रुपने अतिशय हायजेनिक पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. त्या रक्ताचा लाभ समाजातील अनेक गरजूंना होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

17 वर्षांत 4700 रक्तदात्यांचे योगदान : मळाई ग्रुप प्रमुख अशोकराव थोरात म्हणाले, समाजातील अनेकांनी आत्मीयतेने केलेल्या रक्तदानाचा फायदा समाजातील अनेक रुग्णांना होत असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. मळाई ग्रुपने रक्तदाते घडवले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 17 वर्षांमध्ये जवळपास 4700 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

2000 रुग्णांना पुनश्च मोफत रक्तपुरवठा : 2000 रुग्णांनी पुनश्च मोफत रक्तपुरवठ्याची सुविधा अनुभवली आहे. गरजू रुग्णांना, रक्तदात्यांच्या कुटुंबीयांना, परिचितांना तात्काळ व मोफत रक्ताचा पुरवठा हे मळाई ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. सदर सेवेमुळे रक्तदात्यांचा मळाई ग्रुपवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. समाजाच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी मळाई ग्रुप सतत कटिबद्ध राहील, असे मतही श्री. थोरात यांनी व्यक्त केले.

आभार : रक्तदान करून मळाई ग्रुपचे ऋणानुबंध जपल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे रक्तदान शिबिराच्या संयोजिका डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी आभार मानले.

मान्यवरांची सदिच्छा भेट : शिबिरास माजी आमदार आनंदराव पाटील, प्रवीण परमार, भरत जंत्रे, भीमा माहूर, शेखर शिर्के, अनिल शिर्के, शिवाजीराव धुमाळ, गरुड सर, हिंदू एकता आंदोलन कराड दक्षिणचे उपाध्यक्ष संदीप मोरे यांनी सदिच्छा भेट देत रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.

बहुमूल्य योगदान : श्री मळाई ग्रुप, विज्ञान प्रबोधिनी कराड, श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी ना. सहकारी पतसंस्था, आदर्श क्रीडा संस्था, यशवंत ब्लड बँक कराडचे डॉ. संदीप यादव, व्यवस्थापक अशोक यादव, महालक्ष्मी ब्लड बँक कराडच्या व्यवस्थापक विना ढापरे, डॉ. संदीप पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पतसंस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक रक्तदाते, सौ अरुणादेवी पाटील, पी. जी. पाटील, बी. बी. पाटील, तुळशीराम शिर्के, वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात, संकेत परमार, डॉ. सारिका गावडे, प्रशांत गावडे, सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सुधीर चिवटे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत, मळाई ग्रुपमधील सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व सदस्य, सौ. शारदा वाघ, विज्ञान प्रबोधिनी कराडचे सचिव महेश सावंत, सहसचिव महेश कांबळे, वैभव शिर्के, दत्तात्रय शिर्के, सिताराम कोळेकर, शिल्पा गोतपागर, सौ. अर्चना पवार, आर. व्ही. थोरात उपस्थित होते.

रक्त व रक्ताचे विविध घटक आवश्यक

रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. प्रत्यक्ष मनुष्यानेच ते दान केल्यास गरजू रुग्णांना उपयोगी येते. ॲनीमिया, थॅलेसेमिया, थ्रोंबोसायटोपेनियम, ब्लड कॅन्सर, डेंग्यू, विविध शस्त्रक्रिया,अपघात इत्यादींमध्ये रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रक्त आणि रक्ताचे विविध घटक आवश्यक असतात, असे श्री. थोरात यांनी सांगितले. 

रक्तदान चळवळ अविरतपणे सुरू 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. ही गरज ओळखून मळाई ग्रुप, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, श्री मळाईदेवी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 17 वर्षे अविरतपणे ही रक्तदानाची चळवळ चालू आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!