मनमोहन सिंग यांच्यासारखा जागतिक अर्थतज्ञ राजकारणात अनावधानाने आला असे वाटते. परंतु राजकारण आणि देशाचे आर्थिक नियोजन हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते बरेच झाले. त्यांच्या या निर्णयाचा देशाला अनेकवेळा फायदा झाला. त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांवर सध्या देशाचा कारभार सुरु आहे. मनमोहन सिंग हे मितभाषी असले तरी त्यांच्या आर्थिक व राजकीय धोरणांचा प्रभाव अजूनही भारतावर आहे. त्यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारताची दखल सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते, हे देशवासीयांवरील ऋण फिटणार नाहीत.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसमधील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. एक अर्थतज्ञ ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास भारतीय राजकारणात महत्वाचा ठरला आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी बुद्धिमत्ता पणाला लावत देशाला सावरले. मन मोहन सिंग हे मितभाषी होते. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. परंतु, भारतात जागतिकीकरणाचे नवे पर्व त्यांनी सुरु केले आहे. आज जो भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, याचे श्रेय नि:संशय मन मोहन सिंग यांना जाते. उच्चशिक्षित आणि संयमी राजकारणी आणि मुत्सद्दी अर्थतज्ञ अशी भूमिका त्यांनी पार पाडली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर अशी भूमिका त्यांनी 1982 साली निभावली होती. भारताच्या आर्थिक हालाखीच्या काळात आपल्या कौशल्याने देशाला सावरण्यात त्यांचा होत होता. मन मोहन सिंग हे भारताच्या पंतप्रधानपदी दोनवेळा राहिले. परंतु, सिंग हे पंतप्रधानपदी असताना कॉंग्रेसमधील राजकारणामुळे अनेकवेळा योग्य निर्णय घेता आला नाही ही खंत आहे. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असताना तत्कालीन कॉंग्रेसने त्यांच्या गुणात्मक क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेतला नाही हे सत्य होय. 1971 पासून मन मोहन सिंग यांनी केंद्र सरकारला अर्थतज्ञ म्हणून सहकार्य केले आणि विविध पदे भूषविली. 2014 साली जेव्हा तत्कालीन माध्यमे पंतप्रधान मन मोहन सिंग यांच्यावर कमकुवत पंतप्रधान म्हणून टीका करत होती, तेव्हा मनमोहन सिंग व्यक्त होत म्हणाले होते की, माध्यमांपेक्षा इतिहासच मला न्याय देईल. कारण आपण राबवलेली आर्थिक धोरणे देशाला सावरतील, याचे सिंग यांना खात्री होती. भारतात बुद्धिमत्तेपेक्षा राजकारणाला जास्त वाव दिला जातो. मोठ्या आवाजात बोलून काही नेते जनतेला आकर्षित करतात, प्रभाव टाकतात. परंतु, मनमोहन सिंग हे मितभाषी असल्याने राजकारणात त्यांचे नाणे वाजले नाही. नेता बोलघेवडा असण्यापेक्षा धोरणी, मुत्सद्दी असावा, असे मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. सिंग यांच्या निधनाने देशाचा आर्थिक दिशादर्शक हरपला आहे.
मनमोहन सिंग हे उच्चशिक्षित होते. त्यांनी 1952 साली पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र विषय घेऊन स्नातकोत्तर पदवी घेतली. त्यांना 1954 साली सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राइट्स पुरस्कार मिळाला. 1957 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. त्यावेळी भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेवर पीएचडी प्रबंध लिहिला होता. मनमोहन सिंग हे 1971-72 दरम्यान परकीय व्यापार मंत्रालयातील आर्थिक सल्लागार होते. 1972-76 दरम्यान ते वित्त मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागारपदी होते. 1976-80 दरम्यान त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक तसेच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे संचालकपद भूषवले. 1982 साली आशियाई विकास बँकेच्या गव्हर्नर मंडळावर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर होते. नोव्हेंबर 1976 एप्रिल 1980 दरम्यान त्यांनी वित्त मंत्रालय (आर्थिक व्यवहार विभाग) मध्ये सचिवपद सांभाळले. तसेच अणुऊर्जा आयोगाचे सदस्य, अंतराळ आयोगाचे वित्त सदस्य, नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव, भारत-जपान संयुक्त अभ्यास समितीच्या भारतीय समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषवली. 16 सप्टेंबर 1982-84 जानेवारी 1985 दरम्यान मनमोहन सिंग यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. 1982-85 दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर म्हणून काम पाहिले. 1983-84 दरम्यान त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. सिंग यांनी भारतीय आर्थिक समितीचे अध्यक्षपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, सरचिटणीस आणि दक्षिण आयोगाचे आयुक्त, जिनिव्हा, पंतप्रधानांचे आर्थिक बाबींचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली. अर्थात सिंग हे जागतिक स्तरावरील अर्थतज्ञ असल्याने त्यांनी ही पदे कौशल्याने भूषवली आणि पदांना न्याय दिला.
मनमोहन सिंग यांच्यासारखा जागतिक अर्थतज्ञ राजकारणात अनावधानाने आला असे वाटते. परंतु, राजकारण आणि देशाचे आर्थिक नियोजन हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते बरेच झाले. त्यांच्या या निर्णयाचा देशाला अनेकवेळा फायदा झाला. त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांवर सध्या देशाचा कारभार सुरु आहे. 1991-96 दरम्यान त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पद भूषवले. ऑक्टोबर 1991 साली ते आसाममधून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले. जून 1995 मध्ये ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. 1996 पासून ते अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. 1996-67 दरम्यान वाणिज्य संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 1998 साली राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावली. जून 2001 मध्ये ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. 2004-14 दरम्यान मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द लक्ष्यवेधी होती. परंतु, त्यांच्यावर पंतप्रधानपदी असताना मौनी पंतप्रधान म्हणून टीका झाली. मनमोहन सिंग हे मितभाषी असले तरी त्यांच्या आर्थिक व राजकीय धोरणांचा प्रभाव अजूनही भारतावर आहे. त्यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारताची दखल सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते, हे देशवासीयांवरील ऋण फिटणार नाहीत.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अचानक प्रकृती बिघडल्याने गुरुवारी त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मनमोहन सिंग यांना फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. या श्वसनाच्या आजारामुळे गुरुवारी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनमोहन सिंग यांना वयोमानानुसार इतर काही आजार होते. त्यांना विस्मरणाचा त्रास होत होता, तसेच दीर्घकाळापासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला सकारात्मक दिशा देणारा अर्थतज्ञ – सभ्य राजकारणी हरपला आहे, असेच म्हणावे लागेल.
– अशोक सुतार / 8600316798
(लेखक विचारवंत, पत्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत)