कराड/प्रतिनिधी : –
कराड व परिसराच्या सध्याच्या पूररेषेमुळे सुमारे 800 ते 900 एकर क्षेत्रपूर बाधित क्षेत्र म्हणून नोंद असून अनेक भू-धारक या माहितीपासून वंचित आहेत. शहरातील सुमारे 800 ते 900 एकर जमीनीचे हजारो कोटींच्या मूल्यांकनापासून भू-धारक वंचित आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी कराड व परिसराच्या पूररेषा फेर सर्वेक्षणासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
सदिच्छा भेट : येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. यावेळी श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार, चेअरमन राजन वेळापूरे, व्हा. चेअरमन अनिल सोनवणे, संचालक अरुण जाधव, प्रा. अशोककुमार चव्हाण, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांचे हस्ते आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
…त्यामुळे पतसंस्थांची अडचण कमी होईल : पतसंस्थांना बँकांप्रमाणे सिक्युरीटी ॲक्टची सुविधा मिळाल्यास थकीत कर्जदारांची वसुली तातडीने करणे सोयीचे होऊन पतसंस्थांची अडचण कमी होईल, असे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, यासाठी विशेष प्रयत्न करुन कायदा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नवीन रस्त्याचा प्रस्ताव विचाराधीन : सातारा किंवा कोल्हापुरकडून विट्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा ताण शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होतो. ही कोंडी फोडण्यासाठी खोडशी, विद्यानगर ते विटा तासगाव महामार्गाला जोडणाऱ्या नवीन रस्त्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवर : यावेळी संस्थापक संजय मोहिरे, संचालक डॉ. संतोष मोहिरे, संचालिका जयाराणी जाधव, सिमा विभुते, चंद्रकांत देसाई, डॉ. जयवंत सातपुते, सुरेश भंडारी, राजेद्रकुमार यादव, सुरेश कोळेकर उपस्थित होते.