डॉ. मनमोहनसिंग यांचा कार्यकाळ सुवर्णकाळच

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी 

कराड/प्रतिनिधी : – 

भारताचे माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कालखंडात अनेक लोकांभिमुख कायदे केले होते. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो 10 वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल, असे मत पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

शोकसंदेश व आठवणी : थोर अर्थतज्ञ आणि देशाची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी अखिल भारतीय आयुर्वि‌ज्ञान संस्थेमध्ये (एम्स) अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, म्हणून उल्लेखनीय काम केलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून त्यांच्या काही आठवणींनाही उजाळा दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मान्यवर.

डॉ. मनमोहनसिंग राजकारणी नव्हते : डॉ. मनमोहनसिंग यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे अत्यंत जवळून काम केल्याची आठवण सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत उच्चशिक्षित होते. तसेच ते मोठे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. ते राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु, ते राजकारणी नव्हते, असं म्हटले जाते. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती, हे मी अगदी जवळून पाहिले आहे. 

जागतिक मंदीतही देशाला झळ बसली नाही : सन 2008 च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहनसिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत श्री. चव्हाण यांनी त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची त्यांनी आपल्या देशाला झळ बसू दिली नाही, असे मत नमूद केले आहे.

अनेक लोकांभिमुख कायद्यांचे निर्माते : डॉ. मनमोहनसिंग यांनी अनेक महत्वाचे कायदे निर्माण केल्याचे सांगताना श्री चव्हाण म्हणाले, मनरेगा सारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, शिक्षण हक्काचा कायदा (Right to Education), वनाधिकार कायदा असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. मनमोहनसिंग यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो 10 वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असे मत व्यक्त करत अशा महान नेत्यास श्री. चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!