बंधुता परिषदेमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवेंद्रसिंहराजे भोसले; कराडमध्ये बंधुता परिषद २०२६ उत्साहात संपन्न

कराड/प्रतिनिधी : – 

महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यासाठी बंधुता परिषदांसारख्या उपक्रमांतून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा ठाम विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

दुसरी बंधुता परिषद : येथील भवानी मैदानावर आयोजित ‘बंधुता परिषद २०२६’ मध्ये ते बोलत होते. २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेला दिलेल्या भेटीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, आमदार अतुल भोसले, लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष डॉ. मकरंद बर्वे, स्वागत समितीचे सदस्य मच्छिंद्र सकटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरांची संघविरोधी भूमिका नव्हती : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समाजात न्याय, समता आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हिंदुत्वाच्या माध्यमातूनही शोषणमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. संघ याच दिशेने कार्यरत आहे. डॉ. आंबेडकरांनी संघविरोधी भूमिका घेतली नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि त्याच मार्गावर चालण्याची संघाची भूमिका राहिली आहे.

राष्ट्रहित सर्वोतोपरी : सर्व जाती नष्ट होऊन समरस हिंदू समाज निर्माण व्हावा, अशी राष्ट्रहित सर्वोतोपरी मानणाऱ्या डॉ. आंबेडकरांची अपेक्षा होती, असे सांगताना किशोर मकवाना म्हणाले, संघ स्थापनेपासूनच समाजातील समरसतेसाठी सातत्याने काम करत असून, प्रत्यक्ष व्यवहारातून समाजपरिवर्तन घडवत आहे.

एकात्म मानवतावादाच्या मार्गाने जायला हवे : संघाविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले गेल्याचे सांगताना डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, विचारस्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्यांनीच संघाच्या व्यासपीठावर जाण्याची बंदी घातली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीवर अपार विश्वास होता. त्यांनी कधीही हिंसाचाराला प्रोत्साहन दिले नाही. दलित समाजानेही आता विचारपूर्वक एकात्म मानवतावादाच्या मार्गाने जायला हवे. सामाजिक समतेची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर लोकांच्या मनामध्ये लढली पाहिजे.

सूत्रसंचालन व आभार : परिषदेचे सूत्रसंचालन वैभव डुबल यांनी केले, तर डॉ. मकरंद बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ. आंबेडकर-संघ भेटीचा ऐतिहासिक पुरावा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील संघ शाखेला दिलेल्या भेटीचा ‘जनता’ दैनिकातील ऐतिहासिक पुरावा सादर करत प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, जर डॉ. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असेल, तर मीही त्यांच्या वाटेने का जाऊ नये? आम्ही समतेसाठी काम करतो. मात्र आम्हाला समतेबरोबरच स्वातंत्र्य, लोकशाहीबरोबरच बंधुताही हवी आहे. संघ जर मोठ्या मनाने बंधुतेचा विचार घेऊन पुढे जात असेल, तर मी त्यासोबत आहे, असे त्यांनी सांगितले. 

‘एक गाव – एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशान’ ठराव एकमताने मंजूर 

महाराष्ट्रातील काही भागांत आजही अंत्यविधीच्या वेळी जातीवादातून अनुचित प्रकार घडत असल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, याकडे लक्ष वेधत ‘एक गाव – एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशानभूमी’ हा ठराव निलेश अलाटे यांनी परिषदेत मांडला. या ठरावानुसार, सर्व समाजासाठी खुली, सोयीसुविधांनी युक्त स्मशानभूमी निर्माण करावी, जातीवादी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा ठरावांना उपस्थितांनी एकमताने मान्यता दिली. 

बाबासाहेबांच्या मुखपत्रातून कराड भेटीचा दाखला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या मुखपत्रातून ते कराडला आले असल्याचा ठोस पुरावा समोर येतो. त्या काळात विचारस्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या काही मंडळींनी संघाच्या व्यासपीठावर जाण्यावर बंदी घातली होती. परिणामी संघाला समजून घेण्यापेक्षा त्याबाबत गैरसमजच अधिक पसरवले गेले. भारतीय राज्यघटनेचा खरा आत्मा बंधुता हाच आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या पुढे जाऊन समरसता हीच समाजाला एकत्र बांधणारी शक्ती आहे, असे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी सांगितले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!