सुकुमार कांबळे; दुसरी समता परिषद उत्साहात; महामानवांचे अपहरण करून राजकारण – विजय मांडके
कराड/प्रतिनिधी : –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही व्यवस्था संपवून संविधानाच्या माध्यमातून देशात लोकशाही प्रस्थापित केली. मात्र आज जाती-जातींत फूट पाडून सत्तेच्या जोरावर काही बहुजन घटकांना सोबत घेऊन संविधान बदलण्याचा भ्रम काहींनी बाळगला आहे. शंकराचार्य जन्मावरून माणसाची ओळख ठरवतात आणि तेच आज बंधुत्वाची भाषा करतात, हा मनुवाद्यांचा कुटील डाव असून, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांचा हा केवळ साडेतीन टक्क्यांचा खेळ आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सुकुमार कांबळे यांनी केली.
दुसरी समता परिषद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कराड नगरपालिकेने मानपत्र प्रदान केल्याच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त समता सामाजिक विकास संस्था, कराड यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या समता परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : या परिषदेस ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय मांडके, संविधान अभ्यासक ॲड. संभाजीराव मोहिते, महाराष्ट्र राज्य भाषा व संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या फरझाना इकबाल, सौ. वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडचे माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
निकष नाकारल्यानेच आरक्षणाची मागणी : सुकुमार कांबळे म्हणाले, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात बंधुता नाही, ती फक्त हिंदू धर्मातच कशी काय. दोन जाती कधीही एक होत नाहीत, असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे. १९३२ सालीच त्यांनी ‘मागासवर्गीय हिंदू नाहीत’ हे स्पष्ट केले होते. आर्थिक निकष नाकारल्यानेच त्यांनी सामाजिक आधारावर आरक्षणाची मागणी केली.
तथाकथित बंधुत्वाला घाबरू नका : बुद्धकाळात वैश्विक समतेची व्यवस्था अस्तित्वात होती. हिंदू धर्माला ना संस्थापक आहे, ना अधिकृत धर्मग्रंथ. गीतेला धर्मग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी न्यायालयानेही मान्य केलेली नाही. त्यामुळे हिंदुत्वाच्या तथाकथित बंधुत्वाला घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले.
जात विकासातील मोठा अडथळा : ज्यांनी शिवरायांचे क्षत्रियत्व नाकारले आणि राज्याभिषेकास विरोध केला, त्यांनीच राजर्षी शाहू महाराजांना कायदेमंडळात प्रवेश दिला नाही. संभाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडला गेला. केवळ जातीच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले यांना नाकारण्यात आले. जात हे विष असून, विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना जशीच्या तशी स्वीकारली असती, तर आज जात अस्तित्वातच राहिली नसती. घटनेतील बंधुत्व स्वीकारण्यास हे लोक का घाबरतात, असा सवाल उपस्थित करत संविधानाच्या चौकटीला हात घातल्यास आम्ही हातात तलवारी घेऊ, असा इशाराही कांबळे यांनी दिला.
महामानवांची नावे घेऊन राजकारण : यावेळी बोलताना विजय मांडके म्हणाले, महात्मा गांधी यांच्या हत्येला वृत्तपत्रात केवळ एका ओळीची जागा मिळते, तर बाबासाहेबांच्या शाखा भेटीला सात ओळी दिल्या जातात, हे नेमके काय सूचित करते? संघाला तब्बल ८५ वर्षांनंतर बंधुतेची आठवण का झाली? हेडगेवार आणि बाबासाहेब यांचे कधीच पटले नाही. भारत हा एकसंघ देश असून, संविधानाने आपल्याला एकत्र बांधून ठेवले आहे. जोपर्यंत हे बंधन मजबूत आहे, तोपर्यंत कोणतीही शक्ती समाजात फूट पाडू शकत नाही. आज महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांची नावे घेऊन राजकारण केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संविधान आपला श्वास व्हायला हवा : जगभरात भारताच्या संविधानाचे महत्त्व मान्य केले जाते, असे सांगताना ॲड. संभाजीराव मोहिते म्हणाले, ज्या संविधानावर देश चालतो, त्यातील एकही पान आपण प्रत्यक्षात चाळत नाही, हे दुर्दैव आहे. संविधान आपला श्वास व्हायला हवा. ते संपवू पाहणाऱ्या नतदृष्ट प्रवृत्तींना मूठमाती देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
वृत्तपत्रातील मजकूर एआयची कमाल : प्रास्ताविकात आनंदराव लादे यांनी, समता परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. काहींनी मुद्दाम बंधुता परिषदांच्या नावाखाली खोडसाळपणा केल्याचा आरोप करत, एक भीमसैनिक म्हणून बाबासाहेबांचा पाईक बनून संविधान वाचवण्याचे काम करत राहणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संबंधितांनी एआयचा वापर करून वृत्तपत्रातील मजकूर तयार करण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
आभार : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोठावळे यांनी केले. प्रार्थनेचे वाचन वैशाली सोनवणे, तर आभार ॲड. स्वप्निल भिसे यांनी मानले. परिषदेस मोठ्या संख्येने आंबेडकरवादी, दलित व नागरिक उपस्थित होते.
कुंभमेळ्याला १४ हजार कोटी, कर्जमाफीला पैसे नाहीत
२० विद्यार्थ्यांचा निकष लावून महाराष्ट्रात तब्बल १५ हजार प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी २० लाख मुले शिक्षणापासून वंचित राहिली, शिक्षक बेरोजगार झाले. यूपीएससी व एमपीएससीची शेकडो पदे थेट भरली गेली, सरकारी नोकऱ्या संपवल्या जात आहेत; मात्र यावर बंधुत्वाची भाषा करणारे गप्प आहेत. सरकार कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी रुपये मंजूर करते; पण शेतकऱ्यांसाठी २०० कोटींची कर्जमाफीही शक्य होत नाही. सरकारी शाळा व विद्यापीठे बंद करून खाजगी शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. या सर्व बाबींचे समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे सुकुमार कांबळे यांनी स्पष्ट केले.
पुरावे न दिल्यास परिषद उधळून लावू
डॉ. आंबेडकरांनी कराड नगरपालिकेचे मानपत्र स्वीकारून तत्कालीन महारवाड्यास भेट दिली होती. मात्र २ जानेवारीची भेट ९ जानेवारीला छापून येते, हा प्रकार संशयास्पद असून, त्या वृत्ताला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. संबंधितांकडे पुरावे असतील तर, त्यांनी ते समोरासमोर सादर करावेत. अन्यथा पुढील वर्षी खोटी परिषद घेतल्यास ती उधळून लावली जाईल, असा स्पष्ट इशारा सुकुमार कांबळे यांनी दिला.
परिषदेत तीन ठराव एकमताने मंजूर
परिषदेत तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड नगरपालिकेचे मानपत्र स्वीकारताना केलेल्या मूळ भाषणाचे शिल्प पालिकेच्या दर्शनी भागात उभारावे. कराड भेटीचा विपर्यास करून एका शाखेत भेट दिल्याचा खोटा दावा करणाऱ्या संस्थेचा जाहीर निषेध करावा आणि खोट्या इतिहासाविरोधात वैचारिक लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार, असे ठराव व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह उपस्थितांनी हात उंचावून एकमताने मंजूर केले.