एआयवर आधारित ऊस परिसंवादासह स्व. विलासकाका उंडाळकर व स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पुण्यतिथी सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील – उंडाळकर आणि स्वातंत्र्यसैनिक कै. शामराव पाटील अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे, ता. कराड येथे शनिवार व रविवार, दि. ३ व ४ जानेवारी रोजी संयुक्त शेतकरी मेळावा व पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांद्वारे शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर व प्रेरणादायी उपक्रमांची सांगड घालण्यात आली असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी दिली.
शेतकरी व सभासद मेळावा : शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक कै. शामराव पाटील अण्णा यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त दुपारी २ वाजता उंडाळे येथे शेतकरी व सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित ऊस परिसंवाद’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिसंवाद : या परिसंवादासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे ऊस विशेषतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, अथणी शुगर लिमिटेडचे चेअरमन व माजी मंत्री श्रीमंत पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विशेष सहकार्य : हा कार्यक्रम स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, रयत सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यकर्ता मेळावा : तर रविवार, दि. ४ जानेवारी रोजी माजी मंत्री व लोकनेते स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीनकाका पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिर, उंडाळे येथे होणार आहे.
आवाहन : या दोन्ही कार्यक्रमांना शेतकरी, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. पाटील आणि शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांनी केले आहे.