एआय व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पालकमंत्री शंभूराज देसाई; कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 

कराड/प्रतिनिधी : – 

भारत कृषिप्रधान देश असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असून, त्यातून कृषीविषयक माहिती, बाजारभाव व विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला जात आहे. शेतीमध्ये अत्याधुनिक अवजारे व एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्यात कराडचे कृषी प्रदर्शन मोलाचे योगदान देईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व खाणीकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी खासदार नितीनकाका पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विलासकाकांचा हेतू सफल : पालकमंत्री देसाई म्हणाले, स्वर्गीय विलासकाकांनी दूरदृष्टीतून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेले हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आज कराडसह सातारा व लगतच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, नवी दिशा देण्याचा त्यांचा हेतू आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना अनुदान : या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टॉल उभारण्यात आले असल्याचे सांगत खासदार नितीनकाका पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या नफ्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी ऊस पिकासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याअंतर्गत एक एकर जमीनधारक शेतकऱ्याला दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याच्या माध्यमातून २०० शेतकरी, अशा एकूण २ हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

बारामती कृषी विद्यापीठासोबत करार : जिल्हा बँकेतून दहा हजार रुपये, व्हीएसआयमार्फत ९,५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयांची स्वतःची गुंतवणूक करायची आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी बारामती कृषी विद्यापीठासोबत करार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतमालाला जास्तीत जास्त दर : स्वर्गीय विलासकाकांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या या कृषी प्रदर्शनाचा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे सांगत उदयसिंह पाटील म्हणाले, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी या प्रदर्शनात सर्वांगीण माहिती देण्यात येत आहे. भविष्यातही बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविक व आभार : प्रारंभी बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

दोन कार्यक्रमपत्रिकांवरून पालकमंत्र्यांचा कृषी अधिकाऱ्यांना सवाल 

कराडचे कृषी प्रदर्शन बाजार समिती व जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त माध्यमातून आयोजित करण्यात येते. मात्र यंदा दोन वेगवेगळ्या कार्यक्रमपत्रिका कशा काढण्यात आल्या, असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती व कृषी विभाग यांनी एकसंघपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!