आ. डॉ. अतुल भोसले; अर्थसंकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती
कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून, कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची घोषणा ही या भागासाठी महत्त्वाची ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केली.
रोजगारनिर्मितीला चालना : अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना आ. डॉ. भोसले यांनी सांगितले की, कराड येथील विमानतळाचा विस्तार झाल्यानंतर या भागाचा प्रमुख शहरांशी हवाई संपर्क वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेली लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नव्या उद्योगांसाठी कराड परिसर आकर्षणाचे केंद्र ठरेल. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळून कराडची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले. या निर्णयाबद्दल आ. डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले.












