महिला सक्षमीकरणातूनच समाज प्रगतीचा मार्ग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रीनिवास पाटील; जागतिक महिला दिनानिमित्त मारूल हवेली येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

कराड/प्रतिनिधी : –

महिलांचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, समाजातील संघर्ष करणाऱ्या व कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या कार्याला दिलेली खरी दाद आहे. महिलांना समान हक्क, दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळाल्यासच त्यांच्या सन्मानाला खरे अर्थ प्राप्त होतात, असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

कर्तृत्ववान महिलांचा गौरव : पाटण तालुक्यातील मारूल हवेली गावात जागतिक महिला दिनानिमित्त श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि ग्रामपंचायत मारूल हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्षा सौ. रचना पाटील, सरपंच सौ. अक्काताई मस्के यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

परंपरा, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जपण्यात योगदान : आपल्या भाषणात श्रीनिवास पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही स्त्री स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची ताकद ठेवते. कुटुंबावर संकटे आली तरी ती खंबीरपणे उभी राहत कुटुंबाला आधार देते. आधुनिकतेच्या युगातही परंपरा, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जपण्यामध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

नात्यांतून स्त्री समाजजीवन अधिक समृद्ध : आई, बहिण, आत्या, मामी अशा विविध नात्यांतून स्त्री समाजजीवन अधिक समृद्ध करत असते. आज महिलांनी शिक्षण, प्रशासन, उद्योग, शेती अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असेही श्रीनिवास पाटील यांनी नमूद केले.

…तर संपूर्ण कुटुंब व समाज सक्षम होतो : फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील म्हणाले, जागतिक महिला दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून, महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याची आणि समानतेच्या दिशेने समाजाने वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. कुटुंबासाठी महिलांनी दिलेला त्याग, कष्ट आणि समर्पणाचा गौरव करण्याची ही संधी आहे. महिलांना समान संधी आणि सन्मान मिळाला तर समाजाच्या प्रगतीला गती मिळते. एक स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो, असेही त्यांनी सांगितले.

निराधार महिलांचाही सन्मान : या कार्यक्रमात गावातील शिक्षण, आरोग्य, प्रशासन, शेती, व्यवसाय आणि रोजगार क्षेत्रात कार्यरत महिलांसह निराधार महिलांचाही सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!