कराड दक्षिणला अर्थसंकल्पातून ३३.६७ कोटींची विकासकामे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार अतुल भोसले यांच्यापाठपुराव्याला यश; रस्ते-पुलांसाठी मोठा निधी

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल ३३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ते सुधारणा, पुलांची उभारणी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसाठी हा निधी उपलब्ध झाला असून, यासाठी आमदार अतुल भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली.

सातत्याने पाठपुरावा : कराड दक्षिणमध्ये पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार डॉ. भोसले यांनी राज्य शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती, नवीन बांधकामे आणि पूल उभारणीसाठी निधी मिळावा, यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांची दखल घेत नाबार्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ता सुधारणा व नवीन रिटेनिंग वॉल उभारणी : या मंजूर कामांमध्ये कोयना वसाहत-जखिणवाडी-नांदलापूर मार्गावरील रस्त्याची सुधारणा व नवीन रिटेनिंग वॉल उभारणी (३ कोटी), कोयना वसाहत ते नांदलापूर रस्त्याची सुधारणा (३ कोटी), पाचवडेश्वर-कोडोली-दुशेरे-शेणोली स्टेशन मार्गाची दुरुस्ती (१ कोटी), येणके-आणे-कोळे-कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी मार्गावरील सुधारणा (२ कोटी) अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

रस्ता सुधारणा व बंदिस्त गटार : आटके टप्पा-आटके जाधव मळा-रेठरे बु. मार्गाची सुधारणा (१.५० कोटी), कालेटेक-काले-संजयनगर-कालवडे-नांदगाव-साळशिरंबे-पाचुंब्री मार्गाची दुरुस्ती (३ कोटी), विंग ते घारेवाडी दरम्यान रस्त्याची सुधारणा व दुतर्फा बंदिस्त गटार बांधकाम (१.५० कोटी) अशी कामेही मंजूर झाली आहेत.

काँक्रीट, पुलाचे बांधकाम व इमारत : बैलबाजार (रा. मा. १४४) ते ढेबेवाडी फाटा या मार्गाचे काँक्रीट चौपदरीकरण (१० कोटी), नांदगाव येथे मांड नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम (६.७३ कोटी) आणि कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नवीन कार्यालयीन इमारतीसाठी (१.९३ कोटी) निधी मंजूर करण्यात आला आहे.

वाहतूक व्यवस्था सुलभ : या निधीमुळे कराड दक्षिणमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांना गती मिळणार असून, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

आभार : या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्थानिक स्तरावर स्वागत होत असून, भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!